‘कोरोना लस घ्या, बक्षीस मिळवा’, घरी घेऊन जा TV आणि मोबाइल फोन! प्रशासनाची खास स्कीम
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 01:10 PM2021-10-17T13:10:22+5:302021-10-17T13:11:42+5:30
या शिबिरात, जे लोक कोरोना लस घेतील, त्यांना टेलिव्हिजन सेट, मोबाईल फोन अथवा ब्लँकेट जिंकण्याची संधी मिळणार आहे.
लोकांना लस घेण्यासाठी प्रोत्साहित करण्याकरिता जगभरात अनेक योजना राबविल्या जात आहेत आणि बक्षिसे दिली जात आहेत. काहीसे असेच आता मणिपूरमध्येही दिसून येत आहे. येथे लोकांना लस घेतल्यानंतर टीव्ही सेट (tv) आणि मोबाईल फोन (Mobile Phone) जिंकण्याची संधी आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहतीनुसार, मणिपूरच्या इम्फाळ पश्चिम जिल्ह्यात मेगा लसीकरण शिबिराचे आयोजिन करण्यात आले आहे. या शिबिरात, जे लोक कोरोना लस घेतील, त्यांना टेलिव्हिजन सेट, मोबाईल फोन अथवा ब्लँकेट जिंकण्याची संधी मिळणार आहे. (Take Corona vaccine and win a tv, mobile phone)
अधिकाऱ्यांनी म्हटले आहे, की इंफाल पश्चिम जिल्हा प्रशासनाला लसीकरण वाढवायचे आहे. त्यामुळे येथे प्रशासनाने ‘लस टोचा, बक्षीस मिळवा’ (Get a shot, win a prize) असे म्हणत, मेगा व्हॅक्सीनेशनसह बंपर ड्रॉ कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे.
24 ऑक्टोबर, 31 ऑक्टोबर आणि सात नोव्हेंबरला जिल्ह्यातील तीन केंद्रांवर या लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. इंफाळ पश्चिम जिल्ह्याचे उपायुक्त टीएच किरनकुमार यांनी यासंदर्भात एक नोटिफिकेशनही जारी केले आहे. यात सांगण्यात आले आहे, की तीन केंद्रांवर लस घेणाऱ्यांना बंपर ड्रॉमध्ये भाग घेण्याची आणि बक्षीस जिंकण्याची संधी मिळेल.
बक्षिसात काय?
नोटिफिकेशनमध्ये सांगण्यात आले आहे, की पहीले बक्षीस एक मोठ्या स्क्रीनचा टीव्ही सेट, दुसरे बक्षीस मोबाईल फोन आणि तिसरे बक्षीस ब्लँकेट आणि इतर 10 उत्तेजनार्थ बक्षिसे, असे या लकी ड्रॉचे स्वरूप असेल. तसेच 18 वर्षांपेक्षा जास्त वयाची कोणतीही व्यक्ती कोविड -19 लसीकरणाच्या पहिल्या किंवा दुसऱ्या डोससाठी सहभागी होण्यास पात्र असेल, असेही यात सांगण्यात आले आहे.