Manipur Violence : भीषण! मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उसळला, जमावाने 15 घरं जाळली; तरुणाला घातल्या गोळ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2023 01:19 PM2023-08-06T13:19:05+5:302023-08-06T13:25:34+5:30
Manipur Violence : इम्फाळ पश्चिम जिल्ह्यात जमावाने 15 घरांना आग लावली. हिंसाचारात एका 45 वर्षीय व्यक्तीला गोळी लागली.
मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उसळला आहे. इम्फाळ पश्चिम जिल्ह्यात जमावाने 15 घरांना आग लावली. हिंसाचारात एका 45 वर्षीय व्यक्तीला गोळी लागली. त्यांना तातडीने रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (RIMS) मध्ये दाखल करण्यात आले. सध्या व्यक्तीची प्रकृती धोक्याबाहेर आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी लँगोल क्रीडा गावात घडली.
माहिती मिळताच सुरक्षा दलाचे जवान पोहोचले आणि जमावाने परिस्थिती नियंत्रणात आणली. जमावाला पांगवण्यासाठी सुरक्षा दलाच्या जवानांनी अश्रुधुराच्या अनेक फैरी झाडल्या. रविवारी सकाळी परिस्थिती सुधारली, पण निर्बंध कायम आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील चेकोन भागातही हिंसाचार झाला आहे. आजूबाजूच्या तीन घरांनाही आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं.
याआधी शुक्रवारी रात्री बिष्णुपूर जिल्ह्यात मेईतेई समुदायाच्या तीन लोकांची हत्या करण्यात आली होती. नंतर कुकी समाजाच्या अनेक घरांनाही आग लावली. पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे की, काही लोक बफर झोन ओलांडून मेईतेई भागात आले आणि त्यांनी मेईतेई भागात गोळीबार केला. सैन्याने बिष्णुपूर जिल्ह्यातील क्वाकटा भागाच्या दोन किमी पलीकडे बफर झोन तयार केला आहे.
गुरुवारी संध्याकाळीही बिष्णुपूरमध्ये अनेक ठिकाणी गोळीबार झाला, त्यानंतर परिसरातील परिस्थिती तणावपूर्ण बनली. जमावाची सुरक्षा कर्मचाऱ्यांशी चकमकही झाली. सुरक्षा दलांनी सात बेकायदेशीर बंकर उद्ध्वस्त केले. विष्णुपूर जिल्ह्यातील आणखी एका आयआरबी युनिटच्या चौक्यांवर जमावाने हल्ला केला आणि दारुगोळ्यासह अनेक शस्त्रे लुटली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.