27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 10:40 AM2024-11-19T10:40:40+5:302024-11-19T10:41:54+5:30
Manipur Violence: मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला असून, अनेक ठिकामी कुकी आणि मेईतेई समाज रस्त्यावर उतरला आहे.
Manipur Violence Latest News: मणिपूर पुन्हा एकदा हिंसाचाराच्या आगीत जळतोय. राज्यातील जिरीबाममध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीनंतर अतिरेक्यांनी 6 जणांचे अपहरण करुन त्यांची निर्घृण हत्या केली. यामुळे परिसरात स्थानिक लोक तीव्र विरोध करत आहेत. अनेक मंत्र्यांच्या घरांवर हल्ले झाले असून, आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांच्या घरावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
कुकी अतिरेक्यांनी एकाच कुटुंबातील सहा जणांची निर्घृण हत्या केल्यानंतर मेईतेई समाजाचे संतप्त लोक रस्त्यावर उतरले आहेत. ते सातत्याने हिंसक आंदोलन करत आहेत. दुसरीकडे, कुकी समुदाय 11 नोव्हेंबरच्या चकमकीला बनावट म्हणत आहे.
आता काय परिस्थिती आहे?
मणिपूरमधील सध्याची परिस्थिती पुन्हा एकदा पूर्वीसारखीच झाली आहे. राज्यातील अनेक भाग हिंसाचाराच्या विळख्यात आहेत. एकीकडे कुकी समाजाचे लोक आपल्या मागण्यांसाठी हिंसाचाराचा अवलंब करत आहेत, तर दुसरीकडे एकाच कुटुंबातील सहा जणांच्या हत्येप्रकरणी कठोर कारवाईची मागणी करत मेईती समाज रस्त्यावर उतरला आहे. सध्याची परिस्थिती पाहता 19 नोव्हेंबर रोजी मणिपूरमधील सर्व शाळा बंद करण्यात आल्या असून, इंटरनेट सेवाही आधीच बंद आहे.
नवीन आव्हान काय आहे?
कुकी समाजाचे लोक या हिंसाचारात मारल्या गेलेल्यांना न्याय देण्याची मागणी करत आहेत. शुक्रवारी चुरचंदपूर येथेही शेकडो लोकांनी निदर्शने केली. कुकी संघटनांनी असा दावाही केला आहे की, जे लोक मरण पावले ते अतिरेकी नसून गावातील स्वयंसेवक होते. दरम्यान, कुकी समाजाचे प्रतिनिधीत्व करणारी प्रमुख संघटना, इंडिजिनस ट्रायबल लीडर्स फोरम, केंद्रीय पोलीस दलाच्या गोळीबारात ठार झालेल्या 10 कुकी तरुणांचे शवविच्छेदन अहवाल येईपर्यंत अंत्यसंस्कार केले जाणार नाहीत, असे म्हटले आहे. दुसरीकडे, मेईतेई समाजही रस्त्यावर उतरला असून, एकाच कुटुंबातील 6 जणांचे अपहरण करून नंतर त्यांची हत्या करणाऱ्या कुकी अतिरेक्यांवर कठोर कारवाई न झाल्यास मोठ्या आंदोलनाची धमकी दिली आहे.
गृहमंत्री काय म्हणाले?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी (18 नोव्हेंबर 2024) सलग दुसऱ्या दिवशी मणिपूरमधील सुरक्षा परिस्थिती आणि तेथे सुरक्षा दलांच्या तैनातीचा आढावा घेतला. शाह यांनी उच्च अधिकाऱ्यांना जातीय हिंसाचारामुळे प्रभावित झालेल्या राज्यातील शांतता आणि सुव्यवस्था लवकरात लवकर पूर्ववत करण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश दिले.
मणिपूरमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने CAPF च्या आणखी 50 कंपन्या पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. अशा प्रकारे आता राज्यात CAPF च्या एकूण 268 कंपन्या तैनात केल्या जाणार आहेत. म्हणजेच, राज्यातील हिंसाचारग्रस्त भागात तैनात असलेल्या सैनिकांची संख्या 26,800 पर्यंत वाढेल. या 50 कंपन्यांमध्ये सर्वाधिक संख्या सीआरपीएफ कंपन्यांची असेल, तर उर्वरित कंपन्या बीएसएफ आणि इतर सुरक्षा दलांच्या असतील.
सरकारचे काय प्रयत्न आहेत?
मणिपूरमधील हिंसाचार रोखण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार वेगवेगळे प्रयत्न करत आहेत. राज्य सरकारने हिंसाचारग्रस्त सात जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस इंटरनेट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने CAPF च्या 50 अतिरिक्त कंपन्या येथे पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. लोकांना शांततेचे आवाहनही केले जात आहे.