Manipur Violence: मणिपूर हिंसाचारात 98 लोकांचा मृत्यू, अमित शहांच्या आवाहनानंतर राज्यभरातून 140 शस्त्रे सरेंडर...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2023 03:34 PM2023-06-02T15:34:25+5:302023-06-02T15:34:54+5:30
गेल्या अनेक दिवसांपासून दोन समुदायामधील हिंसाचाराने संपूर्ण मणिपूर राज्य पेटून निघाले आहे.
Manipur Violence: गेल्या अनेक दिवसांपासून मणिपूरमध्ये प्रचंड हिंसाचार होत आहे. दोन समुदायामधील हिंसाचाराने संपूर्ण राज्य पेटून निघालंय. या हिंसाचारात आतापर्यंत अनेक लोकांचा जीव गेला आहे, तर शेकडो जखमी आहेत. या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मणिपूरचा दौरा केला. यावेळी त्यांनी बंडखोरांना शस्त्रे टाकून आत्मसमर्पण करण्याचे आवाहन केले होते. यानंतर मणिपूरच्या विविध ठिकाणांहून 140 शस्त्रे आत्मसमर्पण करण्यात आली आहेत.
कर्फ्यू शिथिल
मणिपूरमध्ये मेईतेई आणि कुकी समुदायांमध्ये वाद आहे. या वादाचे रुपांतर हिंसाचारात झाले आणि त्यात आतापर्यंत 98 लोक ठार झाले आहेत, तर जखमींची संख्या 300 च्या पुढे गेली आहे. सुदैवाने गेल्या 20 तासांपासून हिंसाचाराची कोणतीही घटना घडलेली नाही. आज इम्फाळ पूर्व, विष्णुपूरसह अनेक हिंसाचारग्रस्त जिल्ह्यांमध्ये कर्फ्यू 8 ते 12 तासांसाठी शिथिल करण्यात आला आहे. तामेंगलाँग, नोनी, सेनापती, उखरुल, कमजोंग या भागातून कर्फ्यू पूर्णपणे हटवण्यात आला आहे.
अमित शहांचे आवाहन
गृहमंत्री अमित शहा 29 मे रोजी चार दिवसांच्या मणिपूर दौऱ्यावर आले होते. येथे त्यांनी हिंसाचारग्रस्त भागाचा आढावा घेतला आणि हिंसाचाराच्या चौकशीचे आदेश दिले. ते म्हणाले की, उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांचे एक पॅनेल मणिपूरमधील हिंसाचाराची चौकशी करेल. कुकी आणि मेईतेई समुदायातील पीडित लोकांचीही त्यांनी भेट घेतली. यासोबतच मदत छावण्यांमध्ये राहणाऱ्या लोकांच्या सुरक्षेचा आढावा घेतला.
#WATCH | After Union Home Minister Amit Shah's appeal, 140 weapons have been surrendered at different places in Manipur: Manipur Police pic.twitter.com/LXvPVnA7tl
— ANI (@ANI) June 2, 2023
अमित शाह यांनी इम्फाळमध्ये उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसोबत सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. सशस्त्र हल्लेखोरांवर कारवाईचे आश्वासन त्यांनी दिले. ज्यांनी शस्त्रे लुटली आहेत त्यांनी ती तात्काळ परत करावीत, जेणेकरून राज्यात शांतता कायम राहील, असे आवाहन त्यांनी केले. त्यांच्या आवाहनाचा परिणामही दिसून आला आहे. 140 शस्त्रे आत्मसमर्पण करण्यात आली आहेत. या शस्त्रांमध्ये SLR 29, कार्बाइन, AK, INSAS रायफल, INSAS LMG, 303 रायफल, 9mm पिस्तूल, 32 पिस्तूल, M16 रायफल, स्मॉग गन आणि अश्रुधुराचे गोळे, स्टेन गन, मॉडिफाईड रायफल, ग्रेनेड यांचा समावेश आहे.
नेमका वाद काय?
मेईतेई समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) दर्जा देण्याच्या मागणीच्या निषेधार्थ 3 मे रोजी मणिपूरमधील सर्व 10 जिल्ह्यांमध्ये 'आदिवासी एकता मार्च' काढण्यात आला होता. त्या मोर्चानंतरच राज्यात हिंसाचार सुरू झाला. ईशान्येला वसलेल्या या राज्यात अनेक ठिकाणी जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटना घडल्या. आरक्षित वन जमिनीवर राहणाऱ्या कुकी समाजातील लोकांना बेदखल करण्याचा डाव असल्याचा आरोप होत आहे. यामुळेच दोन समुदायांमध्ये हा हिंसाचार वाढला.