मणिपूर हिंसाचार: जमावाने रुग्णवाहिका पेटवली, आई आणि 8 वर्षीय मुलासह तिघांचा होरपळून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2023 01:56 PM2023-06-07T13:56:05+5:302023-06-07T13:56:41+5:30
आठ वर्षीय मुलाला गोळी लागल्यानंतर आई त्याला घेऊन रुग्णालयात जात होती, वाटेतच जमावाने जाळून मारलं.
इंफाळ : गेल्या अनेक दिवसांपासून मणिपूरमध्ये सुरू असलेला हिंसाचार अद्याप शमलेला नाही. राज्यात विविध ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. दरम्यान, रविवारी इम्फाळ पश्चिम जिल्ह्यातील इरोसेम्बा येथे जमावाने एका रुग्णवाहिकेला आग लावल्याची घटना घडली. या घटनेत आठ वर्षांचा मुलगा, त्याची आई आणि त्याच्या एका नातेवाईकाचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हिंसाचारात आठ वर्षीय मुलाच्या डोक्याला मार लागला होता. त्याची आई आणि नातेवाईक मुलाला इम्फाळमधील रुग्णालयात घेऊन जात होते. यावेळी काही लोकांनी सायंकाळी 6.30 च्या सुमारास इरोसेम्बा येथे रुग्णवाहिका थांबवली आणि तिला आग लावली. यावेळी वाहनातील तिघांचाही होरपळून मृत्यू झाला. टोन्सिंग हँगिंग (8), त्याची आई मीना हँगिंग (45) आणि नातेवाईक लिडिया लोरेम्बम (37) अशी जमावाच्या हल्ल्यात ठार झालेल्या तिघांची नावे आहेत.
आसाम रायफल्सच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या घटनेची पुष्टी केली आणि सांगितले की, घटनास्थळी आणि आसपास सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मृत तिघे मेईतेई समाजातील होते. ते सध्या कांगचूप येथील आसाम रायफल्सच्या मदत शिबिरात राहत होते. 4 जून रोजी सायंकाळी परिसरात गोळीबार सुरू झाला आणि छावणीतच त्याला गोळी लागली. आसाम रायफल्सच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ताबडतोब इंफाळमध्ये पोलिसांशी बोलून रुग्णवाहिकेची व्यवस्था केली. पण, वाटेतच जमावाने तिघांना जाळून मारले.