मणिपूर हिंसाचार : सीबीआयने २७ गुन्ह्यांचा तपास घेतला हाती, महिलांवरील अत्याचाराच्या १९ गुन्ह्यांचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 01:32 AM2023-08-31T01:32:00+5:302023-08-31T05:49:29+5:30
सीबीआयने या प्रकरणांची पुन्हा नोंदणी केली आहे; परंतु, उत्तर-पूर्व राज्यातील संवेदनशील परिस्थितीमुळे त्यांचे तपशील सार्वजनिक केले नाहीत.
नवी दिल्ली : मणिपूरमधील जातीय हिंसाचाराच्या संदर्भात नोंदवलेल्या २७ गुन्ह्यांचा तपास केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबीआय) हाती घेतला आहे, त्यापैकी १९ गुन्हे महिलांवरील अत्याचारासंबंधित आहेत. सूत्रांनी सांगितले की, ताज्या आकडेवारीनुसार, सीबीआयने आतापर्यंत राज्य पोलिसांकडे सोपविलेल्या २७ प्रकरणांमध्ये पुन्हा गुन्हे नोंदविले आहेत. यामध्ये महिलांवरील अत्याचारासंदर्भात १९ गुन्ह्यांचा, जमावाकडून शस्त्रसाठा लुटण्याचे ३ गुन्हे, २ खून, दंगल आणि हत्या, अपहरण आणि सामान्य गुन्हेगारी कटाच्या प्रत्येकी एका गुन्ह्याचा समावेश आहे.
सीबीआयने या प्रकरणांची पुन्हा नोंदणी केली आहे; परंतु, उत्तर-पूर्व राज्यातील संवेदनशील परिस्थितीमुळे त्यांचे तपशील सार्वजनिक केले नाहीत. सीबीआयच्या उच्च अधिकाऱ्यांनी प्रकरणांच्या तपासासाठी देशभरातील विविध विभागांमधून २९ महिलांसह ५३ अधिकाऱ्यांचे पथक बोलावल्यानंतर तपासाला वेग आला आहे. सीबीआय तपासासाठी इतक्या मोठ्या संख्येने महिला अधिकारी एकत्र तैनात करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
दोन अतिरिक्त पोलिस अधीक्षक आणि सहा पोलिस उपअधीक्षक (सर्व महिला) देखील ५३ सदस्यीय पथकाचा भाग आहेत. मेतेई समुदायाच्या अनुसूचित जमातीचा दर्जा मिळावा, या मागणीला विरोध करण्यासाठी ३ मे रोजी ‘आदिवासी एकता मार्च’ आयोजित केल्यानंतर मणिपूरमध्ये उसळलेल्या जातीय हिंसाचारात १६० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.