मणिपूर: मला घ्यायला परत ये... आजीचे शेवटचे शब्द; हल्लेखोरांनी स्वातंत्र्य सैनिकाच्या पत्नीला जिवंत जाळलं
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2023 11:29 PM2023-07-22T23:29:30+5:302023-07-22T23:40:16+5:30
Manipur violence Horror story : पीडित आजींचे दिवंगत पती एस चुराचंद सिंह यांना माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी सन्मानित केले होते.
इंफाल - मणिपूरमध्ये दोन आदिवासी महिलांची नग्न धिंड काढल्याच्या प्रकरणानंतर, हृदय पिळवटून टाकणाऱ्या अनेक कथा, घटना समोर येत आहेत. काकचिंग जिल्ह्यातील सेराऊ गावात एक स्वातंत्र्य सेनानीच्या 80 वर्षांच्या पत्नीस त्यांच्याच घरात जिंवंत जाळल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर, त्यांचा नातू जेव्हा तेथे पोहोचला, तेव्हा केवळ मलब्यात दबलेले अवशेषच त्याच्या हाती लागले. पीडित आजींचे दिवंगत पती एस चुराचंद सिंह यांना माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी सन्मानित केले होते.
घर बाहेरून बंद करून लावण्यात आली आग -
या वृद्ध अजीचे नाव इबेतोंबी असे होते. सेराऊ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, 80 वर्षांच्या या आजींना त्यांच्या घरात बंद करण्यात आले आणि शस्त्रधारी जमावाने घराला घेऊन आग लावली. ही घटना 28 मेच्या रात्रीची आहे. याच दिवशी सेराऊमध्ये प्रचंड हिंसाचार आणि गोळीबारही झाला होता.
'आजीने आधी आम्हाला पळून जाण्यास सांगितले होते' -
इबेतोंबी यांचे नातू प्रेमकांत यांनी एनडीटीव्हीसोबत बोलताना सांगितले, "मी मृत्यूला थोडक्याने मात दिली. आजीला वाचविण्याच्या प्रयत्नात माझ्या हाताला आणि मांडीला गोळी लागली होती आणि मी जखमी झालो होतो. जेव्हा आमच्यावर हल्ला झाला, तेव्हा माझ्या आजीने वयाच्या कारणामुळे आधी आम्हाला पळून जाण्यास सांगितले होते. घराबाहेर गोळीबार सुरू होता. अशा परिस्थितीत वृद्ध व्यक्तीला तेथून पळ काढणे अवघड होते. आम्ही जेव्हा निघालो तेव्हा, आजी म्हणाली होती, माझ्यासाठी परत या, ते तिचे शेवटचे शब्द होते."
'आम्ही जेव्हा परतलो तेव्हा...' -
प्रेमकांत यांची पत्नी तंपकसना यांनी सांगितले, आम्ही पळ काढून स्थानिक आमदाराच्या घराचा आसरा घेतला होता. आम्ही रात्री दोन वाजता घरातून पळून कसे बसे आमदाराच्या घरी पोहोचलो होतो. यानंतर आम्ही पहाटे साडेपाच वाजता तेथे गेलो, तेव्हा आमचे घर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते.