अमित शहांच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी सुरक्षा दलाची मोठी कारवाई; 40 बंडखोरांचा खात्मा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2023 07:26 PM2023-05-28T19:26:51+5:302023-05-28T21:13:20+5:30
मणिपूरमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गृहमंत्री अमित शहा उद्या तिथे जाणार आहेत.
Manipur Violence: गेल्या अनेक दिवसांपासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू आहे. याविरोधात मणिपूर पोलीस कमांडो तीव्र लढा देत आहेत. गेल्या आठ तासांपासून पोलीस आणि बंडखोरांमध्ये राज्याच्या अनेक भागात गोळीबार झाला आहे. मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांनी सांगितल्यानुसार, आतापर्यंत 40 बंडखोर ठार झाल्याची माहिती मिळाली आहे. हे दहशतवादी एम-16, एके-47 असॉल्ट रायफल आणि स्नायपर गनचा वापर सामान्य नागरिकांवर करत आहेत.
सीएम बिरेन सिंह यांनी दावा केला आहे की, बंडखोर/दंगलखोर नि:शस्त्र नागरिकांवर गोळीबार करत आहेत. अनेक गावात घरे जाळण्यासाठी ते आले होते. सध्या लष्कर आणि इतर सुरक्षा दलांच्या मदतीने त्यांच्यावर जोरदार कारवाई सुरू आहे. मणिपूर तोडण्याचा प्रयत्न करणारे सशस्त्र दहशतवादी आणि केंद्राच्या मदतीने राज्य सरकार यांच्यात लढाई सुरू आहे.
#ManipurViolence | "We have taken strict action. Till now we have reports that around 40 terrorists have been eliminated," says Manipur CM N Biren Singh pic.twitter.com/jB5eh77f7J
— ANI (@ANI) May 28, 2023
बंडखोरांनी 5 भागांवर हल्ले केले
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, काल रात्री दोन वाजता बंडखोरांनी इम्फाळ खोरे आणि आसपासच्या भागात एकाच वेळी हल्ला केला. यामध्ये सेकमाई, सुगनू, कुंबी, फयेंग आणि सेराऊ प्रदेशांचा समावेश आहे. इतर अनेक भागात गोळीबार आणि रस्त्यावर बेवारस मृतदेह पडल्याची माहिती समोर येत आहे.
अमित शहा उद्या मणिपूरला जाणार
गृहमंत्री अमित शहा उद्या मणिपूरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांनी मेईतेई आणि कुकी या दोन्ही समुदायांना शांतता राखण्याचे आणि सामान्य स्थिती आणण्यासाठी काम करण्याचे आवाहन केले. लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनीही काल सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्याचा दोन दिवसीय दौरा केला. इम्फाळ खोऱ्यात आणि आजूबाजूला राहणारे मेतेई लोक आणि टेकड्यांमध्ये राहणारी कुकी जमाती यांच्यात हा जातीय हिंसाचार सुरू आहे.