2 विद्यार्थ्यांच्या मृतदेहाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर मणिपूरमध्ये तणाव वाढला, CBIचे पथक दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 05:14 PM2023-09-27T17:14:30+5:302023-09-27T17:14:41+5:30
Manipur Violence: मागील काही महिन्यांपासून हिंसाचाराच्या आगीत होरपळत असलेल्या मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा पेटली आहे.
Manipur Clash: मागील काही महिन्यांपासून हिंसाचाराच्या आगीत होरपळत असलेल्या मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा पेटली आहे. मणिपूरमधील दोन विद्यार्थ्यांचे अपहरण आणि हत्येनंतर हिंसा भडकली आहे. आता या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीबीआयचे पथक बुधवारी (27 सप्टेंबर) विशेष विमानाने इम्फाळला पोहोचले. या टीमचे नेतृत्व एजन्सीचे विशेष संचालक अजय भटनागर करत आहेत.
वृत्तसंस्था पीटीआयच्या म्हणण्यानुसार, बुधवारी इंफाळमधील सीएम सचिवालयापासून सुमारे 200 मीटर अंतरावर असलेल्या मोइरांगखोम येथे दगडफेक करणाऱ्या जमावाला पांगवण्यासाठी सुरक्षा दलांनी अश्रुधुराच्या गोळ्या झाडल्या. या घटनेत अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. जुलैमध्ये बेपत्ता झालेल्या दोन तरुणांच्या अपहरण आणि हत्येच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या रॅलीत विद्यार्थी सहभागी झाले होते. बेपत्ता तरुणाचे फोटो नुकतेच सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. 'वुई वॉन्ट जस्टिस'च्या घोषणा देत विद्यार्थी मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्या बंगल्याकडे जात होते.
मारेकऱ्यांना अटक करण्याची मागणी
रॅलीचे नेतृत्व करणारे विद्यार्थी नेते लांथेंगबा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना या दोन तरुणांची हत्या करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी केली. दोन्ही तरुणांच्या मारेकऱ्यांना 24 तासांच्या आत अटक करावी आणि त्यांचे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आणावेत, अशी त्यांची मागणी आहे. दरम्यान, काही विद्यार्थ्यांनी दगडफेक सुरू केल्याने परिस्थिती अचानक बिघडली. यानंतर पोलिसांनाही प्रत्युत्तर द्यावे लागले.
मणिपूर अशांत राज्य म्हणून घोषित
ईशान्येकडील मणिपूर राज्यात परिस्थिती गंभीर झाल्याने राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. सरकारने संपूर्ण राज्य 'अशांत क्षेत्र' म्हणून घोषित केले आहे. तणावाची परिस्थिती पाहता इंटरनेट सेवादेखील बंद करण्यात आली आहे. हिंसाचाराच्या घटनांमध्ये घट झाल्यानंतर सरकारने अलीकडेच 23 सप्टेंबर रोजी मोबाइल इंटरनेट सेवा पूर्ववत केली होती. पण, पुन्हा एकदा हिंसेची आग वाढत चालली आहे. मणिपूरमधील वाढत्या तणावामुळे मंगळवारपासून पाच दिवसांसाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती.