Manipur Violence : मणिपूर हिंसाचारानंतर मुख्यमंत्र्यांविरोधात मशाल घेऊन रस्त्यावर उतरल्या महिला, केली मोठी मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 10:54 AM2024-01-18T10:54:57+5:302024-01-18T11:10:11+5:30
Manipur Violence : ज्यातील वाढत्या हिंसाचाराचा निषेध करून राज्याचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्या शासकीय निवासस्थानावर मोर्चा काढला.
मणिपूरमधील हिंसाचाराच्या संदर्भात महिला आंदोलकांनी राजधानी इम्फाळमध्ये मशाल रॅली काढली. यावेळी त्यांनी राज्यातील वाढत्या हिंसाचाराचा निषेध करून राज्याचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्या शासकीय निवासस्थानावर मोर्चा काढला. तेंगनोउपल जिल्ह्यातील भारत-म्यानमार सीमेवरील मोरेह येथे केलेल्या हल्ल्यात दोन जवान शहीद झाल्यानंतर ही रॅली काढण्यात आली.
मीरा पायबी संघटनेशी संबंधित या महिला मालोम, कीशमपत आणि क्वाकीथेल भागातून आल्या होत्या आणि त्यांनी रॅलीदरम्यान मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजीही केली. यावेळी आंदोलक महिलांनी मुख्यमंत्री सचिवालयात घुसण्याचा प्रयत्न केल्याचं सांगण्यात आलं. मात्र, पोलिसांनी त्यांना आत जाण्यापासून रोखलं.
SOO करार रद्द करा, आंदोलक महिलांची मागणी
आंदोलकांनी मोरेह आणि मणिपूरच्या इतर भागात अलीकडील गोळीबाराच्या घटनांचा निषेध केला आणि अतिरेकी संघटनांसोबत सस्पेंशन ऑफ ऑपरेशन्स (SOO) करार रद्द करण्याची मागणी केली. काही गटांशी राजकीय चर्चा सुरू करण्याच्या उद्देशाने 22 ऑगस्ट 2008 रोजी या करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
17 जानेवारीला पहाटे 4 वाजता मोरेह येथील चिकीम गावातील डोंगराळ भागात हल्ला केला. हा हल्ला झाला तेव्हा जवान झोपले होते. या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारला टेंग्नॉपालमध्ये अशांततेच्या शक्यतेची माहिती मिळाली होती, त्यानुसार सरकारने 16 जानेवारीच्या रात्री 12 वाजता या भागात कर्फ्यू लागू केला होता. त्यानंतर हल्ला झाला त्यामुळे राज्य सरकारविरोधात प्रचंड नाराजी पसरली होती.
मणिपूर हिंसाचारात 180 हून अधिक लोकांचा मृत्यू, हजारो लोक बेघर
गेल्या वर्षी 3 मे रोजी, खोरे-बहुल मैतेई आणि टेकडी-बहुल कुकी यांच्यात जातीय संघर्ष झाला, त्यानंतर मणिपूरमध्ये हिंसाचार सुरूच आहे. या हिंसाचारात 180 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर हजारो लोक बेघर झाले आहेत.