Manish Sisodia arrested : मद्य घोटाळ्यात उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांना अटक, 8 तासांच्या चौकशीनंतर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2023 07:57 PM2023-02-26T19:57:24+5:302023-02-26T20:00:29+5:30
Manish Sisodia arrested : आज CBI ने दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची 8 तास चौकशी केली.
Manish Sisodia arrested : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना कथित मद्य घोटाळ्यात अटक करण्यात आली आहे. अटकेपूर्वी सीबीआयने सिसोदिया यांची सुमारे 8 तास चौकशी केली होती. अबकारी धोरण घोटाळ्याप्रकरणी सिसोदिया यांची सीबीआय कार्यालयात चौकशी झाली. सीएम अरविंद केजरीवाल आणि स्वतः सिसोदिया यांनी अटकेबाबत आधीच भीती व्यक्त केली होती.
सीबीआय एफआयआरमधील आरोपी क्रमांक एक असलेल्या मनीष सिसोदिया यांची मागील वर्षी 17 ऑक्टोबर रोजी चौकशी करण्यात आली होती. एका महिन्यानंतर, 25 नोव्हेंबर रोजी सीबीआयने या प्रकरणात आरोपपत्र दाखल केले. सीबीआयच्या आरोपपत्रात सिसोदिया यांचे नाव नव्हते, कारण त्यावेळी त्यांच्या आणि इतर संशयित आणि आरोपींविरुद्ध सीबीआयचा तपास चालू होता.
Delhi | CBI arrests Delhi Deputy CM Manish Sisodia in connection with liquor policy case. pic.twitter.com/gFjHPV33ZG
— ANI (@ANI) February 26, 2023
सीबीआयने रविवारी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या चौकशीची दुसरी फेरी सुरू केली. राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहल्यानंतर सिसोदिया सीबीआय कार्यालयात पोहोचले. तसेच, सिसोदिया यांच्या चौकशीच्या निषेधार्थ सीबीआय कार्यालयाजवळ निदर्शने करणाऱ्या आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह आणि मंत्री गोपाल राय यांच्यासह 50 जणांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले.
तुरुंगात जाणे वरदान आहे - केजरीवाल
सिसोदिया यांच्या चौकशीपूर्वी केजरीवाल यांनी ट्विट करून म्हटले की, 'मनीष, देव तुझ्या पाठीशी आहे. लाखो मुलांचे आणि त्यांच्या पालकांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत. देशासाठी आणि समाजासाठी तुरुंगात जाणे हा दुर्गुण नसून गौरव आहे. तू लवकरच तुरुंगातून परत येवो, अशी मी परमेश्वराला प्रार्थना करतो. दिल्लीची मुले, पालक आणि आम्ही सर्व तुमची वाट पाहत आहोत.' आणखी एका ट्विटमध्ये केजरीवाल यांनी लिहिले की, 'जे गरीब मुलांना चांगले शिक्षण देणारे आणि भविष्य घडवणारे तुरुंगात असतात आणि अब्जावधींचा घोटाळा करणारे पंतप्रधानांचे जवळचे मित्र बाहेर असतात.'
'नाव - मनीष सिसोदिया आणि गुन्हा...' राघव चढ्ढा यांचे ट्विट
आप नेते आणि राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांनी ट्विट केले की, 'नाव - मनीष सिसोदिया आणि गुन्हा - गरीबांच्या मुलांना उत्कृष्ट शिक्षण दिले. आज दिल्लीच्या सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या 18 लाख मुलांचे डोळे ओले झाले आहेत, कारण भाजप त्यांच्या लाडक्या मनीष काकांना अटक करत आहे. हे भाजप सरकार आहे, इथे लहान मुलांच्या हातात पुस्तके देणारा सर्वात मोठा गुन्हेगार मानला जातो.'