Manish Sisodia: 'भाजपने 200 कोटींमध्ये विकल्या काश्मिरी पंडितांच्या वेदना', मनीष सिसोदियांचे टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 04:40 PM2022-03-28T16:40:03+5:302022-03-28T16:40:19+5:30
Manish Sisodiya: 'चित्रपटातून कमावलेले 200 कोटी रुपये काश्मीर पंडितांच्या कल्याणासाठी द्यावेत.'
नवी दिल्ली: दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटावरुन भाजपवर जोरदार हल्ला चढवला. सिसोदिया म्हणाले की, त्यांना काश्मीरबद्दल विशेष आदर आहे, काश्मिरी लोक आवडतात. अटलजी किंवा जगमोहन यांच्या काळात जे काही घडले ते भूतकाळातील गोष्ट आहे. पण केंद्रात 8 वर्षांपासून भाजपचे सरकार आहे, तरीही काश्मिरी पंडितांना विस्थापितांप्रमाणे का जगावे लागत आहे.
'चित्रपट यूट्यूबवर टाकावा'
ते पुढे म्हणाले की, ''काश्मीरी पंडितांना वाटते की, त्यांच्या वेदना देशाने समजून घ्याव्यात. त्यांना असे वाटत नाही की, त्यांच्या वेदना 200 कोटींमध्ये विकल्या जाव्यात. चित्रपटाने 200 कोटींचा गल्ला जमवला आहे, आता तो चित्रपट यूट्यूबवर अपलोड करावा, म्हणजे देशातील सर्व लोकांना तो पाहता येईल आणि काश्मिरी नागरिकांच्या वेदना सर्वांना पाहता येतील. भाजपला काश्मीर फाईल्सची चिंता आहे आणि आम्हाला काश्मीरी पंडितांची.''
'भाजपने काश्मिरींच्या वेदना विकल्या'
सिसोदिया पुढे म्हणाले की, ''काश्मिरी पंडितांच्या वेदना 200 कोटींना विकण्याचे काम भाजपने केले. भाजपवाले फक्त काश्मीर फाईल्सबद्दल बोलत आहेत. पण, भाजपने आठ वर्षांत काश्मिरी पंडितांसाठी काय केले? काश्मिरी पंडितांच्या बाबतीत भाजप पूर्णपणे अपयशी ठरला आहे. चित्रपटातून कमावलेले 200 कोटी रुपये काश्मीर पंडितांच्या कल्याणकारी संस्थांना द्यावेत.''
'मी स्वतः चित्रपट पाहीन'
मनीष सिसोदिया पुढे म्हणतात की, ''काश्मीरच्या मुद्द्यावर चित्रपट बनला, ही चांगली गोष्ट आहे. अधिवेशन झाल्यानंतर मी स्वतः 200-400 रुपयांचे तिकीट काढून हा चित्रपट पाहायला जाईल. मी यापूर्वी काश्मीरला गेलो आहे, त्या लोकांच्या वेदना पाहिल्या आहेत. मला आता पुन्हा काश्मिरी लोकांना भेटायला आवडेल. चित्रपटातून कमावलेले 200 कोटी घरे आणि वस्तुंसाठी काश्मिरी लोकांना द्यावेत. मी भाजपला विनंती करतो की, चित्रपटाने खूप धंदा केला, आता सर्वांना पाहण्यासाठी चित्रपट युट्यूबवर टाकावा'', असेही ते म्हणाले.