Manish Sisodia: "भाजप मुख्यालयावरच बुलडोझर फिरवा, त्यांच्यामुळेच देशात दंगली"
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 10:19 PM2022-04-20T22:19:42+5:302022-04-20T22:20:39+5:30
मनिष सिसोदिया यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत भाजपवर जोरदार निशाणा साधला
नवी दिल्ली - उत्तर दिल्ली महापालिकेनं आज दिल्लीच्या जहांगीरपुरी येथील हिंसाचाराच्या आरोपींच्या बेकायदेशीर घरं आणि मालमत्तांवर मोठी कारवाई करत बुलडोजर चालवण्यास सुरुवात केली आहे. पण कारवाईला सुरुवात होण्याच्या काही मिनिटांत सुप्रीम कोर्टानं जहांगीरपुरीमधील एमसीडीच्या कारवाईला स्थगितीचे आदेश दिले. आता याप्रकरणावर गुरुवारी सुनावणी होणार असल्याचं कोर्टानं आदेश जारी केलेत. या कारवाईनंतर सोशल मीडियात फोटो व्हायरल झाले आहेत. त्यावरुन, एमआयएमचे नेते असदुद्दीन औवेसींनी भाजपने गरिबांविरुद्ध यु्द्धच पुकारल्याचं म्हटलं आहे. आता, आपचे नेते आणि दिल्लीचे उप-मुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनीही भाजपर हल्लाबोल केला आहे.
मनिष सिसोदिया यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत भाजपवर जोरदार निशाणा साधला. दिल्लीतील हिंसाचारानंतर प्रशासनाकडून होत असलेल्या कारवाईवरुन त्यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केलं. भाजपच देशभरात दंगली घडवत आहे. रोहिंग्यांना भाजपचे थारा दिला आहे, म्हणूनच देशातील दंगली, गुंडागर्दी बंद करण्यासाठी भाजपच्या मुख्यालयावरच बुलडोझर चालवायला पाहिजे, असे सिसोदिया यांनी म्हटलंय.
देशात गेल्या 8 वर्षांपासून भाजप सत्तेत आहे, पण पुढच्या पिढीचा विचार ते करत नाहीत. बेरोजगारांना रोजगार देण्याचं, महागाई कमी करण्याचं नावच भाजप घेत नाही. भाजप नेते आणि कार्यकर्तेच गुंडागर्दी करतात, त्यामुळेच देशात गुंडागर्दी आणि दंगली होत असल्याचा गंभीर आरोप सिसोदिया यांनी केला आहे. देशातील ही अराजकता बंद करायची असेल, तर भाजपच्या मुख्यालयावरच बुलडोझर फिरवायला हवा, असेही सिसोदिया यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले.
प्रशासनाकडून कारवाईसाठी ताठर भूमिका
दरम्यान, जहांगीरपुरी येथील कारवाईबाबत, सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची प्रत प्राप्त होईपर्यंत कारवाई सुरुच राहिल अशी भूमिका प्रशासनानं घेतल्याचं दिसून आलं. त्यामुळे या परिसरात सकाळपासूनच हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळला. प्रशासनाने पोलीस बळाचा वापर करुन अनेकांच्या घरावर आणि दुकानांवर बुलडोझर चालवला. एमआयएमचे प्रमुख असुदुद्दीन औवेसींनी या कारवाईविरुद्ध ट्विटवरुन आवाज उठवला आहे. त्यांनी कारवाईचे फोटो ट्विटरवरुन शेअर करत दिल्ली सरकार आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.