Manish Sisodia: सिसोदियांच्या घरावर CBI छापा पडताच दिल्लीत डझनभर IAS अधिकाऱ्यांची बदली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2022 12:19 PM2022-08-20T12:19:34+5:302022-08-20T12:22:52+5:30
देशात सध्या ईड, इन्कम टॅक्स आणि सीबीआय या केंद्रीय तपास यंत्रणांकडून मोठ्या प्रमाणात धाडी सुरू आहेत
नवी दिल्ली - दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआयने शुक्रवारी सकाळीच धाड टाकली. यासंदर्भात स्वत: सिसोदिया यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. तसेच, सीबीआयच्या तपासाला पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचंही त्यांनी ट्विटवरुन सांगितलं आहे. आता, एकीकडे दिल्लीच्या उपमुख्यमंत्र्यांच्या घरावर सीबीआयने धाड टाकल्यानंतर दुसरीकडे नायब राज्यपालांनी डझनभर आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये, उदीत राय यांचाही समावेश आहे.
देशात सध्या ईड, इन्कम टॅक्स आणि सीबीआय या केंद्रीय तपास यंत्रणांकडून मोठ्या प्रमाणात धाडी सुरू आहेत. या धाडीत अनेक राजकीय मंडळींचा समावेश दिसून येत आहे. गत महिन्यात प. बंगालमध्ये पार्थ चॅटर्जींच्या संपत्तीवर धाड टाकल्यानंतर महाराष्ट्रातही ईडीने खासदार संजय राऊत यांच्यावर कारवाई करत त्यांना अटक केली आहे. त्यानंतर, आता दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआयची रेड पडली आहे. सिसोदिय यांनी ट्विट करुन सीबीआयचं स्वागतही केलं. मात्र, सिसोदिया यांच्या घरावर छापा टाकल्यानंतर काही तासांतच दिल्ली सरकारने डझनभर आयएएस अधिकाऱ्यांची बदली केली आहे.
दिल्ली सरकारच्या सेवा विभागातील बदली आदेशानुसार ज्यांची बदली करण्यात आली. त्यामध्ये, आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाचे सचिव उदीत प्रकाश राय यांचाही सहभाग आहे. जे 2007 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. दिल्लीच्या उपराज्यपालांनी भ्रष्टाचाराच्या 2 प्रकरणंत एका कार्यकारी अभियंत्यास चुकीच्या पद्धतीने नफा मिळवून दिल्याप्रकरणी 50 लाख रुपये लाच घेतल्याच्या आरोपात राय यांच्याविरुद्धच्या कारवाईवर समाधान व्यक्त केलं आहे. नव्या आदेशानुसार राय यांना प्रशासकीय सुधारणा विभागात विशेष सचिवपदी बदली देण्यात आली आहे.
दरम्यान, सीबीआयने मनिष सिसोदिया यांच्या घरावर छापेमारी करुन त्यांना प्रथम आरोपी बनवले आहे. त्यामध्ये, एकूण 15 जण आरोपी करण्यात आले आहेत. सीबीआयने पीसी अॅक्ट 1988, 120 बी, 477 ए वास्तविक गुन्हेगारी अनुषंगाने गुन्हा दाखल केला आहे.