पंजाबच्या शिक्षणमंत्र्यांना मनीष सिसोदियांचे खुले आव्हान, 250 शाळांची यादी जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2021 08:38 PM2021-11-28T20:38:15+5:302021-11-28T20:38:46+5:30
Manish Sisodia : शाळांची यादी जाहीर करताना सिसोदिया म्हणाले की, दिल्ली सरकारने गेल्या 6 वर्षांत सरकारी शाळांच्या पायाभूत सुविधा जागतिक दर्जाच्या केल्या आहेत.
नवी दिल्ली : पंजाबचेशिक्षणमंत्री परगट सिंग यांचे आव्हान स्वीकारत दिल्लीचेशिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिल्लीतील 250 सरकारी शाळांची यादी जाहीर केली आहे. तसेच, परगट सिंग यांनी या सरकारी शाळांना भेट द्यावी आणि दिल्ली सरकारने गेल्या ५ वर्षात शिक्षण क्षेत्रात प्रगती केली आहे, ते पाहावे, असे खुले आमंत्रण मनीष सिसोदिया यांनी दिले आहे.
याचबरोबर, पंजाबच्या शिक्षणमंत्र्यांनी पंजाबमधील 250 सरकारी शाळांची यादी जाहीर करावी, जेणेकरून पंजाबचे शिक्षण मॉडेलही दिसेल आणि त्यानंतर दोन्ही शिक्षण मॉडेल्सवर चर्चा व्हावी, जेणेकरून पंजाबमधील लोकांना कोणते राज्यातील शिक्षणाचे मॉडेल चांगले आहे, हे समजेल असे मनीष सिसोदिया म्हणाले.
मनीष सिसोदिया म्हणाले की, दिल्लीच्या शिक्षण व्यवस्थेत गेल्या ५-६ वर्षांत जे बदल झाले आहेत, त्यामुळे देशातील इतर पक्षांनाही शिक्षणावर विचार करायला आणि बोलायला भाग पाडले आहे आणि ही अतिशय आनंदाची बाब आहे. देशाच्या राजकारणात शिक्षण हा महत्त्वाचा मुद्दा बनत चालला आहे.
आम्ही दिल्लीतील 1000 सरकारी शाळांची यादी देखील जारी करू शकतो. पंजाबचे शिक्षण मंत्री परगट सिंग यांनी या शाळा पाहाव्यात. मात्र परगट सिंग यांनी 250 शाळांची यादी मागितली आहे, त्यामुळे त्यांनी आधी या 250 शाळांमध्ये येऊन पाहाव्यात, असेही मनीष सिसोदिया म्हणाले.
याशिवाय, परगट सिंग ज्यावेळी दिल्ली दौऱ्यावर येतील, त्यावेळी त्यांनी मीडियाला सोबत आणावे, जेणेकरून पंजाबच्या लोकांनाही दिल्लीच्या सरकारी शाळांमधील जागतिक दर्जाचे पायाभूत सुविधा आणि दर्जेदार शिक्षण पाहता येईल आणि पंजाबच्या शिक्षण व्यवस्थेशी तुलना करता येईल, असे मनीष सिसोदिया यांनी सांगितले.
'शिक्षकांना परदेशात प्रशिक्षणासाठी पाठवले'
शाळांची यादी जाहीर करताना सिसोदिया म्हणाले की, दिल्ली सरकारने गेल्या 6 वर्षांत सरकारी शाळांच्या पायाभूत सुविधा जागतिक दर्जाच्या केल्या आहेत. दर्जेदार शिक्षणासाठी शिक्षकांना परदेशात प्रशिक्षणासाठी पाठवले. शाळांच्या प्रमुखांना आयआयएमसारख्या संस्थांकडून नेतृत्व प्रशिक्षण दिले जात होते, त्यामुळे दिल्लीतील सरकारी शाळांचा निकाल आज खासगी शाळांपेक्षा चांगला लागला आहे.
यंदा दिल्लीतील सरकारी शाळांचा बारावीचा निकाल ९९.९६ टक्के लागला आहे. आमच्या शाळा अशा आहेत जिथे एका शाळेतून 51 मुले NEET सारख्या परीक्षेत पात्र ठरतात. या वर्षी दिल्लीच्या सरकारी शाळांमधील सुमारे 500 मुले NEET आणि 500 मुले JEE Mains उत्तीर्ण झाली आहेत. तसेच 70 मुलांनी JEE Advanced पास केले आहे, असे मनीष सिसोदिया म्हणाले.
काय म्हणाले होते परगट सिंग?
पंजाबमधील सरकारी शाळांची दिल्लीतील शाळांशी तुलना करण्याबाबत पंजाबचे शिक्षणमंत्री परगट सिंग यांनी ट्विट केले होते. ते म्हणाले होते की, "मी दिल्लीच्या शिक्षणमंत्र्यांचे स्वागत करतो. आम्ही पंजाब आणि दिल्लीतील 10 शाळांच्या जागी 250-250 शाळा आणू. आम्ही एनपीजीआय निर्देशांकावर शाळांची तुलना करू. आम्ही शाळेच्या पायाभूत सुविधा आणि स्मार्ट वर्गखोल्यांची संख्या यावर चर्चा करू. राज्यातील ग्रामीण आणि सीमावर्ती भागातील शाळांच्या विकासाबाबत चर्चा केली जाईल"
याचबरोबर, परगट सिंग यांनी म्हटले होते की, आम्ही नव्याने भरती झालेल्या शिक्षक आणि कायम शिक्षकांच्या आकडेवारीची तुलना करू. सीमावर्ती शाळांतील शिक्षकांच्या वाढीव संख्येचा डेटा घेऊ. आम्ही दोन्ही राज्यांच्या विद्यार्थ्याची शिक्षक गुणोत्तराशी तुलना करू. आम्ही दिल्लीसारख्या कॉम्पॅक्ट स्थानापेक्षा पंजाबच्या दुर्गम भागात 7 पट अधिक शाळा व्यवस्थापित करण्याच्या आव्हानांची आणि कॅम्पसची तुलना करू. त्या तुलनेत गेल्या 4-5 वर्षांत सरकारी शाळांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या आम्ही घेऊ.