Manish Sisodia : जेलमध्ये गेल्यावर केजरीवालांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा का दिला नाही?; सिसोदियांचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 11:36 AM2024-08-19T11:36:50+5:302024-08-19T11:49:47+5:30
Arvind Kejriwal And Manish Sisodia : अरविंद केजरीवाल जेलमध्ये गेल्यानंतर भाजपाकडून सातत्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. आपचे नेते मनीष सिसोदिया यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल जेलमध्ये गेल्यानंतर भाजपाकडून सातत्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. आपचे नेते मनीष सिसोदिया यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. एका मुलाखतीदरम्यान ते म्हणाले की, सरकारच्या कोणत्याही मंत्र्याला अटक केल्यावर आणि त्यांनी राजीनामा दिल्यानंतर सरकारला कोणताही धोका नाही. पण मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला तर सरकार पडतं.
आप नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, भाजपाच्या केंद्र सरकारला अरविंद केजरीवाल यांना अटक करून सरकार पाडायचं होतं आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांचं हे षड्यंत्र हाणून पाडण्यासाठी राजीनामा दिला नाही.
तुम्हाला अटक झाली तेव्हा तुम्ही उपमुख्यमंत्रीपद भूषवत होतात, तुम्ही राजीनामा का दिला, असा सवाल सिसोदिया यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, मी आत गेलो तेव्हा त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. सत्येंद्र जैन आत होते, त्यांनी राजीनामा दिला नव्हता, मग मलाही आत टाकलं. मी खूप विभाग बघायचो, त्या विभागांचं काम थांबू नये म्हणून मी राजीनामा दिला.
आम आदमी पार्टीची एन्ट्री ही करप्शन मूवमेंटच्या बेसवर झाली होती. तसेच अशा परिस्थितीत केजरीवाल आणि इतर पक्षाचे नेते तुरुंगात आहेत आणि तुम्ही नुकतेच जामिनावर बाहेर आला आहात. अशा स्थितीत पक्षाची प्रतिमा खराब झाली... असं जेव्हा आप नेते मनीष सिसोदिया यांना एका मुलाखतीदरम्यान विचारण्यात आलं. यावर मनीष सिसोदिया म्हणाले की, आमच्यावर आरोप होणार नाहीत याची आम्ही खात्री देऊ शकत नाही.
मनीष सिसोदिया म्हणाले की, आमच्या आमदारांवर असे आरोप करण्यात आले होते, ज्यात कोर्टालाच एजन्सीला सांगावं लागलं की ते त्यांच्यावर अन्याय का करत आहेत. असे अनेक आदेश आहेत ज्यात कोर्टाने एजन्सींना तुम्ही पक्षपातीपणा करत आहात असं सुनावलं. आमच्यावर अनेकदा आरोप झाले पण आम्ही क्लीन म्हणून बाहेर आलो.