CBIकडून मनीष सिसोदियांची चौकशी सुरू; केजरीवाल म्हणाले- 'मनीष 8 डिसेंबरपर्यंत तुरुंगात राहतील...'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2022 01:36 PM2022-10-17T13:36:53+5:302022-10-17T13:37:05+5:30
सीबीआयकडून दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांची उत्पादन शुल्क धोरणातील कथित अनियमिततेप्रकरणी आज चौकशी होत आहे.
नवी दिल्ली: सीबीआयने दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया उत्पादन शुल्क धोरणातील कथित अनियमिततेप्रकरणी आज सकाळी 11 वाजता सीबीआय कार्यालयात चौकशीसाठी पोहोचले. सीबीआयने सिसोदिया यांची चौकशी सुरू केली आहे. तत्पूर्वी, त्यांनी राज्यसभा खासदार संजय सिंह यांच्यासोबत राजघाटावरील महात्मा गांधींच्या समाधीचे दर्शन घेतले. या चौकशीवरुन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर टोला लगावला.
संबंधित बातमी- CBI ने सिसोदियांना चौकशीसाठी बोलावले; केजरीवाल म्हणाले- 'ते आजचे भगत सिंग...'
दिल्ली उत्पादन शुल्क धोरणातील कथित अनियमिततेची सीबीआय चौकशी करत आहे. याआधीही सीबीआयने मनीष सिसोदिया यांच्या ठिकाणांवर अनेकदा छापे टाकले आहेत. त्यांची अनेकदा चौकशीही झाली आहे. मात्र, मनीष सिसोदिया यांचा दावा आहे की, आतापर्यंत सीबीआयला त्यांच्याकडून या प्रकरणाशी संबंधित काहीही मिळालेले नाही. त्यांनी पुन्हा एकदा दावा केला की हे प्रकरण पूर्णपणे खोटं आहे. ते म्हणाले की, भाजप गुजरात गमावत आहे. मला गुजरातला प्रचार करण्यापासून रोखण्यासाठी हा सारा खेळ खेळला जात आहे.
अरविंद केजरीवाल काय म्हणाले?
8 दिसंबर को गुजरात के नतीजे आयेंगे। ये लोग तब तक मनीष को जेल में रखेंगे। ताकि मनीष गुजरात चुनाव में प्रचार के लिए ना जा पायें।
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) October 17, 2022
दुसरीकडे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विटद्वारे भाजपवर जोरदार हल्ला चढवला. 'गुजरातचा निकाल 8 डिसेंबरला लागणार आहे. हे लोक तोपर्यंत मनीषला तुरुंगात ठेवतील. मनीषला गुजरात निवडणुकीच्या प्रचारासाठी जाता येऊ नये, हा त्यांचा प्रयत्न आहे,' अशी टीका केजरीवाल यांनी केली. काल केजरीवालांनी मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांची तुलना भगत सिंग यांच्याशी केली.
सीबीआयकडून सिसोदियांची चौकशी
मनीष सिसोदिया सीबीआयच्या मुख्यालयात पोहोचताच त्यांना एंट्री रजिस्टर देण्यात आले. त्यावर स्वाक्षरी केल्यानंतर सीबीआयचे पथक त्याच्यासोबत आत गेले. सर्व चौकशी अधिकाऱ्यांकडे प्रश्नांच्या वेगवेगळ्या याद्या आहेत. ही चौकशी थोडी लांबू शकते, असे सांगण्यात येत आहे. चौकशीदरम्यान सिसोदिया यांना इतर आरोपी आणि साक्षीदारांचे जबाबही नोंदवण्यात येणार आहेत.
काय आहे वाद?
उपराज्यपाल व्हीके सक्सेना यांनी दिल्लीतील नवीन उत्पादन शुल्क धोरणाच्या अंमलबजावणीतील कथित अनियमिततेची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस केली होती. त्याचबरोबर 11 उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनाही निलंबित करण्यात आले आहे. तेव्हापासून हे मद्य धोरण सीबीआयच्या चौकशीत आहे.