सैन्यासंबंधीच्या विधानावरुन मनीष तिवारी पक्षात एकाकी पडले
By admin | Published: January 10, 2016 04:02 PM2016-01-10T16:02:48+5:302016-01-10T16:18:18+5:30
सैन्याने २०१२ मध्ये दिल्लीच्या दिशेने कूच केले होते या वादग्रस्त विधानावरुन माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते मनीष तिवारी पक्षात एकाकी पडले आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १० - सैन्याने २०१२ मध्ये दिल्लीच्या दिशेने कूच केले होते या वादग्रस्त विधानावरुन माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते मनीष तिवारी पक्षात एकाकी पडले आहेत. मी जे बोललो त्यावर आजही ठाम आहे असे मनीष तिवारी म्हणाले असले तरी, काँग्रेसने तिवारी यांच्या विधानाशी सहमत नसल्याचे स्पष्ट केले आहे.
सैन्याने दिल्लीच्या दिशेने कूच केल्याचे वृत्त पूर्णपणे निराधार आणि चुकीचे आहे. सरकारच्या माहितीशिवाय सैन्याकडून अशी कोणतीही हालचाल झाली नव्हती. आम्ही पूर्णपणे हे वृत्त फेटाळून लावतो असे काँग्रेस नेते पी.सी.चाको यांनी सांगितले. काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी सुध्दा तिवारी यांच्या दाव्यात तथ्य नसल्याचे म्हटले आहे.
त्यापूर्वी रविवारी सकाळी विद्यमान केंद्रीय मंत्री आणि माजी लष्करप्रमुख व्ही.के.सिंह यांनी सुध्दा तिवारींवर टीका केली होती. सध्या मनिष तिवारी रिकामे आहेत. त्यांच्याकडे काहीही काम नाही. या विषयावर माझे पुस्तक आहे. ते त्यांनी वाचावे. त्यातून त्यांच्या सर्व शंका दूर होतील असे व्ही.के.सिंह यांनी सांगितले.