मोदींचे गुरु सावरकरांनीच देशाचं धर्माच्या आधारे विभाजन केले, मणिशंकर अय्यर यांचं वादग्रस्त विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2018 08:51 AM2018-05-08T08:51:14+5:302018-05-08T09:07:42+5:30
काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे.
नवी दिल्ली - काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. मणिशंकर अय्यर एका आंतरराष्ट्रीय परिषदेनिमित्त पाकिस्तानमध्ये गेले आहेत. यावेळी त्यांनी भारतातील सध्याची परिस्थिती असामान्य असल्याचे सांगितले. शिवाय ''विनायक दामोदर सावरकर यांनी 1923 मध्ये हिंदुत्व या शब्दाचा पहिल्यांदा वापर केला, या शब्दाचा उल्लेख कोणत्याही धर्मग्रंथात नव्हता. त्यांनीच धर्माच्या आधारे देशाचे विभाजन केले. द्विराष्ट्राची संकल्पनाही त्यांनीच मांडली होती आणि त्यांचेच समर्थक सध्या भारतात सत्तेत आहेत'', असे वादग्रस्त विधान मणिशंकर अय्यर यांनी केले आहे. लाहोरमधील एका कार्यक्रमात मणिशंकर यांनी सावरकरांविषयी वादग्रस्त विधान केले. वादग्रस्त विधान करण्याची मणिशंकर यांची ही पहिलीच वेळ नाहीय. यापूर्वीही त्यांनी अनेकदा आक्षेपार्ह विधान करत वाद निर्माण केले आहेत.
दरम्यान, रविवारी (6 मे) त्यांनी मोहम्मद अली जिना यांचे कौतुक केले होते. यामुळे भाजपाने अय्यर यांच्यावर प्रचंड टीका केली. यावर त्यांनी भाजपाला प्रत्युत्तर दिले की, ''मी जिना यांचा उल्लेख कायदे आझम म्हणून केला. त्यावर मला पत्रकार विचारतात तुम्ही जिना यांचे कौतुक कसे काय केले?. मग पाकिस्तानमध्ये राहणारे अनेक जण गांधीजींचा उल्लेख महात्मा गांधी असा करतात. मग ते देशभक्त नाहीत का'', असा उलट प्रश्नच त्यांनी उपस्थित केला.
सोबतच अलिगड मुस्लिम युनिर्व्हसिटीतील जिना यांचा फोटो सरकारी गुंडांनी हटवल्याचं सांगतदेखील त्यांनी भाजपावर टीका केली होती. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी मणिकशंकर अय्यर यांच्यावरुन काँग्रेसवर निशाणा साधला. त्यांनी काँग्रेसवर गुजरात निवडणुकीप्रमाणे कर्नाटक निवडणुकीतही पाकिस्तानला सहभागी केल्याचा आरोप केला आहे.
दरम्यान, गुजरात निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मोदींबाबत अपशब्दांचा वापर केल्यानं काँग्रेसनं कारवाई करत मणिशंकर अय्यर यांची पार्टीतून हकालपट्टी केली.
Present situation in India is an aberration, In 1923 a man called VD Savarkar invented a word which doesn't exist in any religious text, 'Hindutva'. So first proponent of the two nation theory was ideological guru of those who are currently in power in India: MA Aiyar in Lahore pic.twitter.com/2C0ovEPRBI
— ANI (@ANI) May 7, 2018