आई-वडील मजूर; गरिबी, उपासमारीशी झुंज देत 'तो' झाला शिक्षक, गावाला वाटतोय अभिमान
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 16:14 IST2025-01-11T16:13:51+5:302025-01-11T16:14:22+5:30
मंजयचं कुटुंब अत्यंत गरिबीत जीवन जगतात. त्याचे वडील परमेश्वर सदा पंजाबमध्ये मजूर म्हणून काम करतात, तर त्याची आई भुखानी देवी गावात इतरांच्या शेतात काम करते.

फोटो - आजतक
दरभंगा जिल्ह्यातील परमार गावातील मंजय लाल सदा य़ाने गरिबी आणि अनेक आव्हानांचा सामना करत बीपीएससी शिक्षक पात्रता परीक्षा (टीआरई) उत्तीर्ण केली आहे. मंजय हा त्याच्या गावातील इंटरमिजिएट उत्तीर्ण होऊन सरकारी नोकरी मिळवणारा पहिला व्यक्ती ठरला आहे. त्याच्या यशाचा केवळ त्याच्या कुटुंबालाच नाही तर संपूर्ण गावाला अभिमान वाटत आहे.
मंजयचं कुटुंब अत्यंत गरिबीत जीवन जगतात. त्याचे वडील परमेश्वर सदा पंजाबमध्ये मजूर म्हणून काम करतात, तर त्याची आई भुखानी देवी गावात इतरांच्या शेतात काम करते. पाच भावंडांपैकी मंजय याने आपलं शिक्षण पूर्ण केलं. उर्वरित भाऊ आणि बहिणींना आर्थिक अडचणींमुळे शाळा सोडावी लागली. माती आणि बांबूपासून बनवलेल्या कच्च्या घरात राहणारा मंजय जुन्या सायकलवरून शाळेत जाऊ लागला. ही सायकल त्याच्या संघर्षात त्याची सोबती होती.
मंजयने गावातील परमार माध्यमिक शाळेतून आठवीपर्यंत शिक्षण घेतलं. त्यानंतर, त्याने दरभंगाच्या आनंदपूर स्कूलमधून इंटरमिजिएट उत्तीर्ण झाला. आपल्या छोट्या खर्चासाठी तो मुलांना शिकवायचा. अडचणी असूनही, त्याने आपला अभ्यास सुरू ठेवला आणि पहिल्याच प्रयत्नात बीपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाली, परंतु एका गुणाने त्याची निवड होऊ शकली नाही. दुसऱ्यांदा कठोर परिश्रम करून त्याने टीआरई परीक्षा उत्तीर्ण केली आणि सरकारी शिक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण केलं.
मंजयची आई भुखानी देवी म्हणाल्या, गरिबी आणि उपासमारीशी झुंज देऊनही मी माझ्या मुलाला शिक्षण दिलं. आज तो शिक्षक झाला आहे, यापेक्षा मोठा आनंद काय असू शकतो. गावात सगळे एकत्र राहत होतो, पण जास्तीचे पैसे कमवण्यासाठी नवरा पंजाबमध्ये मजूर म्हणून काम करतो. बीपीएससीचा निकाल पाहिल्यानंतर, मंजय आणि त्याची आई दोघेही खूप भावनिक झाले आणि खूप रडू लागले.
मंजय म्हणाला, "मी गरिबी खूप जवळून पाहिली आहे. गावातील मुलांना त्यांच्या अभ्यासात मदत करण्याचं माझं स्वप्न आहे. मी त्यांना अभ्यास करण्यास प्रवृत्त करेन." मंजयची गोष्ट लाखो तरुणांसाठी प्रेरणादायी आहे ज्यांना कठीण परिस्थितीशी झुंजत आपलं स्वप्न पूर्ण करत आहेत. त्याच्या यशाने हे सिद्ध केलं की, शिक्षण ही अशी शक्ती आहे जी कोणतीही परिस्थिती बदलू शकते.