गुजरात निवडणुकीच्या प्रचारात मनमोहन सिंग, आज करणार दौरा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2017 08:55 AM2017-11-07T08:55:23+5:302017-11-07T09:14:25+5:30
गुजरातमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळते आहे. भाजपा आणि काँग्रेसकडून निवडणुकीसाठी जोरदार प्रचार केला जातो आहे.
अहमदबाद- गुजरातमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळते आहे. भाजपा आणि काँग्रेसकडून निवडणुकीसाठी जोरदार प्रचार केला जातो आहे. इतकंच नाही, तर एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीही झाडल्या जात आहेत. गुजरात निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासह पक्षाचे बडे नेते मैदानात उतरवले आहेत. या पार्श्वभूमीवर आता देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग काँग्रेसचा प्रचार करणार आहेत. गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील काँग्रेसच्या प्रचारात नोटाबंदी आणि जीएसटीचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवण्यात आलेला आहे. यावरून काँग्रेसला सरकारविरोधी वातावरणनिर्मिती करण्यात काही प्रमाणात यशही मिळाले आहे. त्यामुळे टीकेचा हा मारा आणखीनच तीव्र करण्यासाठी मनमोहन सिंग यांना मैदानात उतरवण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे.
गुजरातमध्ये आज एका दिवसाच्या दौऱ्यावर मनमोहन सिंग आहेत. आजच्या या दौऱ्यामध्ये मनमोहन सिंग तेथील व्यापाऱ्यांशी जीएसटीच्या मुद्द्यावर बोलणार आहेत. नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशाचा विकासदर दोन टक्क्यांनी घसरेल, हे मनमोहन सिंग यांचं भाकीत खरं ठरलं होतं. पण, जागतिक बँकेकडून नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालात भारताने व्यवसाय सुलभता निर्देशांकात मोठी झेप घेतल्याचं स्पष्ट झालं. पण विरोधकांनी जमिनीवरील चित्र प्रत्यक्षात वेगळं असल्याची शंका यावेळी उपस्थित केली. यावरून नरेंद्र मोदी यांनी अप्रत्यक्षपणे मनमोहन सिंग यांना लक्ष्य केलं. मी असा पंतप्रधान आहे की, ज्याने अजूनही जागतिक बँकेची इमारतही बघितलेली नाही. पण, यापूर्वी जागतिक बँकेत काम केलेले लोक या पदावर होते. हेच लोक आता जागतिक बँकेच्या अहवालाविषयी शंका घेत असल्याची टीका मोदींनी केली होती.
मंगळवारी गुजरातमध्ये प्रचाराला आल्यावर मनमोहन सिंग हे अहमदाबाद येथील काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषदही घेणार आहेत. गेल्या वर्षी ८ नोव्हेंबर रोजी नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आला होता. तो दिवस काँग्रेस ‘काळा दिवस’ म्हणून साजरा करणार आहे. त्यापूर्वीच एक दिवस आधी मनमोहन सिंग यांचा गुजरात दौरा होणार आहे. त्यामुळे मनमोहन सिंग यांच्या आजच्या गुजरात दौऱ्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
मनमोहन सिंग गुजरातमध्ये व्यापाऱ्यांशी साधणार संवाद
आज गुजरात दौऱ्यावर असणारे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग लघु उद्योजकांशी संवाद साधणार आहेत. तसंच मनमोहन सिंग पत्रकार परिषदही घेणार आहेत. अर्थव्यवस्थेतवर आधारीत एका चर्चासत्रातही मनमोहन सिंग सहभाग घेतील.