मनमोहन सिंग यांना इंदिरा गांधी पुरस्कार, जगात भारताची मान केली ताठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 06:30 AM2017-11-20T06:30:14+5:302017-11-20T06:30:51+5:30
नवी दिल्ली : शांतता, नि:शस्त्रीकरण आणि विकास या क्षेत्रांतील भरीव कामगिरीसाठी दिल्या जाणा-या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी यंदा माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची निवड करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : शांतता, नि:शस्त्रीकरण आणि विकास या क्षेत्रांतील भरीव कामगिरीसाठी दिल्या जाणा-या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी यंदा माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची निवड करण्यात आली आहे.
‘इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट’तर्फे स्व. इंदिरा गांधी यांच्या जन्मदिनी हा पुरस्कार जाहीर केला जातो. सन २००४ ते सन २०१४ अशी सलग १० वर्षे पंतप्रधान राहून भारताची शान जगात उंचावल्याबद्दल माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखालील निवड मंडळाने डॉ. मनमोहन सिंग यांची निवड केल्याचे, ट्रस्टचे चिटणीस सुमन दुबे यांनी एका निवेदनाद्वारे जाहीर केले. १० वर्षांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत भारताच्या आर्थिक-सामाजिक विकासात दिलेले भरीव योगदान, जगात भारताची प्रतिष्ठा उंचावणे, शेजारी व जगातील इतर महत्त्वाच्या देशांशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित करणे आणि धर्म, जात, भाषा वा पंथ यांचा विचार न करता सर्वसामान्य नागरिकांच्या ख्यालीखुशाली व सुरक्षेसाठी सतत झटणे यासाठी डॉ. मनमोहन सिंग यांना गौरविण्यात येत असल्याचे ट्रस्टने म्हटले.
सलग पाच वर्षांचे दोन कालखंड यशस्वीपणे पूर्ण करणारे डॉ. सिंग हे भारताचे तिसरे पंतप्रधान आहेत व अमेरिकेसोबत झालेला नागरी अणु सुरक्षा करार व कोपनहेगन येथे झालेला जागतिक हवामान बदलाविषयीचा समझोता ही त्यांची भरीव कामगिरी ठरली.