India China FaceOff: पंतप्रधानपदाची जबाबदारी मनमोहन सिंग यांनी शिकवू नये, भाजपाचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 03:42 AM2020-06-23T03:42:09+5:302020-06-23T06:59:53+5:30
म्हटले आहे की, डॉ. सिंग यांनी पंतप्रधान असताना ‘संपुआ’ सरकारच्या काळात त्या पदाच्या प्रतिष्ठेला पद्धतशीरपणे कमीपणा आणला गेला होता.
नितीन अग्रवाल
नवी दिल्ली : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी पंतप्रधानपदाची जबाबदारी काय असते, हे सोडून अन्य विषयांवर आपली विद्वत्ता दाखवावी, असा खरमरीत प्रतिटोला भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सोमवारी लगावला. चीनच्या कुटिलतेस चुकूनही बळ मिळेल, असे वक्तव्य करण्याचे टाळावे, असा सल्ला डॉ. सिंग यांनी पंतप्रधान मोदी यांना दिल्यानंतर नड्डा यांनी अनेक टष्ट्वीट करून त्यावर ही प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले आहे की, डॉ. सिंग यांनी पंतप्रधान असताना ‘संपुआ’ सरकारच्या काळात त्या पदाच्या प्रतिष्ठेला पद्धतशीरपणे कमीपणा आणला गेला होता.
भाजप अध्यक्षांनी म्हटले आहे की, काँग्रेस सातत्याने आपल्या सैन्यदलांची मानखंडना करत आला आहे. ज्या काँग्रेसने भारताचा ४३ हजार चौ. किमीचा भूप्रदेश चीनच्या घशात घातला, त्याच पक्षाचे डॉ. सिंग नेते आहेत. डॉ. सिंग यांनी स्वत: पंतप्रधान असताना चीनच्या कुटिल नीतीची चिंता केली असती तर अधिक चांगले झाले असते. ते पंतप्रधान असताना २०१०-१३ या काळात भारताच्या हद्दीत ६०० वेळा राजरोसपण घुसखोरी
झाली होती. स्वत: डॉ.सिंग यांनी पंतप्रधान या नात्याने देशाची शेकडो चौरस किमी भूमी कोणताही प्रतिकार न करता चीनला देऊन टाकली
होती.
>हा तर निव्वळ शब्दांचा खेळ
डॉ. सिंग यांचे निवेदन म्हणजे निव्वळ शब्दांचा खेळ आहे, असा आरोप करून नड्डा यांनी पुढे म्हटले की, आताची वेळ संपूर्ण देशाने एकजूट राखण्याची आहे, हे डॉ. सिंग यांचे म्हणणे अगदी बरोबर आहे.
पण देशातील ऐक्याच्या वातावरणास नेमके कोण सुरुंग लावत आहे, हे पाहिल्यास डॉ. सिंग यांचे हे शब्द म्हणजे निव्वळ कागदी घोडे आहेत, हे लगेच दिसेल. डॉ. सिंग यांनी राष्ट्रीय एकजुटीचा सल्ला निदान स्वत:च्या पक्षाला दिला तर बरे होईल.