मनमोहन सिंग यांची मोदींनी माफी मागावी, काँग्रेसची मागणी, माजी उपराष्ट्रपतींची बदनामी केल्याचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 12:01 AM2017-12-12T00:01:23+5:302017-12-12T00:01:45+5:30
गुजरात निवडणुकीत पाकिस्तान हस्तक्षेप करत आहे आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग व माजी उपराष्ट्रपती यांच्यासह पाकिस्तानी सैन्याचे माजी महासंचालक आदींची एक बैठक मणिशंकर अय्यर यांच्या निवासस्थानी झाली, असा सनसनाटी आरोप करणाºया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर काँग्रेसने कडाडून टीका केली आहे.
- शीलेश शर्मा
नवी दिल्ली : गुजरात निवडणुकीत पाकिस्तान हस्तक्षेप करत आहे आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग व माजी उपराष्ट्रपती यांच्यासह पाकिस्तानी सैन्याचे माजी महासंचालक आदींची एक बैठक मणिशंकर अय्यर यांच्या निवासस्थानी झाली, असा सनसनाटी आरोप करणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर काँग्रेसने कडाडून टीका केली आहे.
मोदी हे बेजबाबदार विधाने करत असून या प्रकरणी मोदी यांनी मनमोहन सिंग आणि माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांची माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते आनंद शर्मा यांनी केली. आनंद शर्मा म्हणाले की, एका कार्यक्रमाला परराष्ट्र विभागाचे संबंधित आजी, माजी अधिकारी, राजकीय नेते, माजी लष्करप्रमुख, पत्रकार यांची उपस्थिती होती. ही गुप्त बैठक नव्हती.
मोदीजी, प्रचारामध्ये अविश्वसनीय कथा नकोत
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी सोमवारी पुन्हा एकदा भाजप आणि मोदी यांना लक्ष्य केले आहे. गुजरात निवडणुकीत पाकिस्तानचा हस्तक्षेप होत असल्याच्या मोदी यांच्या विधानाचा संदर्भ घेत शत्रुघ्न सिन्हा यांनी मोदी यांच्यावर टीका केली आहे. शत्रुघ्न सिन्हा यांनी व्टिट केले आहे की, माननीय सर, निवडणुका जिंकण्यासाठी असमर्थनीय आणि अविश्वसनीय कथा दररोज सांगण्याची गरज आहे? जातीय वातावरण रोखा. सुदृढ राजकारण आणि निवडणुकांची आज गरज आहे.
आम्हाला धडे नकोत पाकिस्तानने केलेल्या खुलाशानंतर केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सोमवारी पाकिस्तानला लक्ष्य केले. ते म्हणाले की, पाकिस्तानने केलेले वक्तव्य हे काँग्रेस पक्षाला दिलासा देण्यासाठी केल्यासारखे वाटते. पाकिस्तानी विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते मोहम्मद फैसल यांच्या व्टिटनंतर प्रसाद यांनी म्हटले आहे की, भारत आपल्या देशातील लोकशाही स्वबळावर चालविण्यासाठी सक्षम आहे. मी पाकिस्तानला हे सांगू इच्छितो की, भारताचे पंतप्रधान हे निवडून आलेले लोकप्रिय पंतप्रधान आहेत. भारतात दहशतवादाला फूस देण्यात पाकिस्तानचा हात असल्याचे जगजाहीर आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला धडे देणे बंद करावे.
मोदीजी, गुजरातवर बोला जरा : राहुल
पंतप्रधान नरेंद्र मोदी विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात गुजरातच्या विकासावर न बोलता भलत्याच विषयांवर विधाने करीत आहेत. त्यांनी पाकिस्तान वा अन्य विषयांवर बोलण्याचे सोडून गुजरातमध्ये २२ वर्षांत भाजपाने काय विकास केला, हे सांगावे, असा टोला काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी लगावला.राहुल गांधी रोज पंतप्रधानांना गुजरातविषयी सवाल करीत असून, त्याची उत्तरे मागत आहेत.
जिंकण्यासाठी आम्हाला वादात ओढू नका : पाक
इस्लामाबाद : गुजरात निवडणुकीत पाकिस्तानचा उल्लेख झाल्यानंतर पाकिस्तानने आज स्पष्ट केले की, तुमच्या राजकारणात आम्हाला ओढू नका. पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते मोहम्मद फैसल यांनी व्टिट केले आहे की, आपल्या निवडणूक चर्चेत आम्हाला ओढणे बंद करा. असे षडयंत्र करण्याऐवजी आपल्या ताकदीवर निवडणूक जिंकावी.