मनमोहन सिंग यांच्या अपमानाचे प्रकरण : पंतप्रधान मोदींनी माफी मागावी, राज्यसभेत गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 01:12 AM2017-12-20T01:12:41+5:302017-12-20T01:13:02+5:30
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याविरुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या टिप्पणीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांत प्रचंड गदारोळ झाला. मोदी यांनी डॉ. मनमोहन सिंग यांची माफी मागावी, अशी मागणी करीत, काँग्रेसच्या सदस्यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. दरम्यान, अर्थमंत्री अरुण जेटली हा तिढा सोडवण्यासाठी विरोधी नेत्यांशी चर्चा करणार आहेत, असे कळते.
नवी दिल्ली : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याविरुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या टिप्पणीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांत प्रचंड गदारोळ झाला. मोदी यांनी डॉ. मनमोहन सिंग यांची माफी मागावी, अशी मागणी करीत, काँग्रेसच्या सदस्यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. दरम्यान, अर्थमंत्री अरुण जेटली हा तिढा सोडवण्यासाठी विरोधी नेत्यांशी चर्चा करणार आहेत, असे कळते.
डॉ. सिंग व अन्य काँग्रेस नेत्यांनी एका भोजन समारंभात गुजरातच्या प्रश्नाबाबत पाकिस्तानच्या अधिकाºयांशी चर्चा केल्याचा आरोप पंतप्रधान मोदी यांनी गुजरातच्या प्रचारसभेत केला होता. तशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचे तेथे उपस्थित असलेले माजी लष्कर अधिकारी, माजी राजनैतिक अधिकारी व पत्रकार यांनी स्पष्ट केले होते. तसेच डॉ. सिंग यांनीही भोजन समारंभाबाबत निवेदन प्रसिद्ध करून, मोदी यांचे वक्तव्य खोटे असल्याचे दाखवून दिले होते. मोदी यांनी माफी मागावी, असेही डॉ. सिंग म्हणाले होते. लोकसभेत काँग्रेसचे सदस्य आक्रमक होऊन अध्यक्षांच्या आसनासमोर येत होते आणि आमचे म्हणणे ऐकून घ्या, अशी मागणी करत होते. एका माजी पंतप्रधानांचा अपमान झाला असून हे गंभीर प्रकरण असल्याचे काँग्रेस सदस्यांचे मत होते. या गदारोळातच अध्यक्षांनी कामकाज पुढे सुरू ठेवले.
हा गदारोळ सुरू असताना सभागृहात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी उपस्थित होते. बोलण्याची परवानगी मिळत नसल्याचे पाहून काँगे्रस सदस्यांनी सभात्याग केला.
राज्यसभेची समिती?
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याविरुद्ध मोदी यांनी केलेल्या विधानावरून सुरू झालेला संघर्ष किमान राज्यसभेत दूर होण्याची चिन्हे आहेत. या मुद्द्यावर एक पॅनेल स्थापन करण्यावर सहमती झाल्याचे सांगितले जात आहे. या मुद्द्यावरून मोदी यांनी सभागृहात स्पष्टीकरण करावे, अशी मागणी काँग्रेसचे सदस्य करत होते. सभापती व्यंकय्या नायडू यांनी चर्चा करून यावरील मतभेद दूर करण्याचे आवाहन केले. त्यावर सहमती झाली.