मनमोहनसिंग यांची दिशाभूल केली गेली
By admin | Published: May 22, 2017 03:28 AM2017-05-22T03:28:14+5:302017-05-22T03:28:14+5:30
माजी कोळसा सचिव एस. सी. गुप्ता यांनी अप्रामाणिकपणे तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना चुकीची माहिती देऊन दिशाभूल केली, असा निष्कर्ष विशेष न्यायाधीश भारत पाराशर यांनी केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : माजी कोळसा सचिव एस. सी. गुप्ता यांनी अप्रामाणिकपणे तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना चुकीची माहिती देऊन दिशाभूल केली, असा निष्कर्ष विशेष न्यायाधीश भारत पाराशर यांनी केला आहे.
मध्यप्रदेशातील थेसगोरा-बी रुद्रापुरी कोळसा क्षेत्रातील खाणीचा पट्टा कमल स्पाँज स्टील अँड पॉवर लिमिटेडला वाटप करण्यात अनियमितपणा केल्याबद्दल न्या. पाराशर यांनी गुप्ता यांना दोषी ठरविले आहे. तत्कालीन कोळसा सचिव गुप्ता यांनी लबाडीने यासंदर्भात माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांना चुकीची माहिती दिली, असे न्या. पाराशर यांनी म्हटले आहे. चिकित्सा समितीच्या शिफारशींच्या आधारावर त्यांना कार्यवाही करावी लागणार होती. गुप्ता हे या समितीचे अध्यक्ष होते. तेव्हा माजी पंतप्रधानांनी जाणीवपूर्वक मार्गदर्शक तत्त्वाचे पालन केले नाही, असे समजण्याचे कोणतेही कारण नाही. समितीने केलेल्या शिफारशींवर कोळसा मंत्रालयाने पात्रतेच्या अनुषंगाने अर्ज तपासले असावेत आणि समितीने मार्गदर्शक तत्त्वांचे तंतोतत पालन केले असेल, असे समजूनच मनमोहनसिंग यांनी पुढील कार्यवाहीबाबत विचार केला, असेही न्यायालयाने स्पष्ट म्हटले आहे.
चिकित्सा समितीच्या शिफारशींची फाईल पाठविताना कोणत्याही अधिकाऱ्याने पात्रता आणि परिपूर्णता या अनुषंगाने अर्ज तपासण्यात आलेले नाहीत, असा कुठेही उल्लेख नव्हता, असेही न्यायालयाने निदर्शनास आणून दिले आहे. कोळसा खाणपट्टा वाटप प्रकरणातील गैरप्रकारप्रकरणी गुप्ता यांच्यासोबत के. एस. क्रोफा आणि के. सी. समारिया यांनाही विशेष न्यायालयाने दोषी ठरविले आहे.