परदेशात जाऊन लग्न करणाऱ्यांवर पंतप्रधान मोदी स्पष्टच बोलले; सांगितलं, कसं होतंय भारताचं नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2023 03:09 PM2023-11-26T15:09:47+5:302023-11-26T15:10:59+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेशात जाऊन लग्न करणाऱ्यांवर मोठे भाष्य केले आहे...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'मन की बात' कार्यक्रमाच्या माध्यमाने जनतेशी संवाद साधला. 'मन की बात' कार्यक्रमाचा आजचा 107वा अॅपिसोड होता. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी 'मन की बात' कार्यक्रम ब्रॉडकास्ट होतो. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, परदेशात जाऊन लग्न करणाऱ्यांवरही भाष्य केले. "आपण विचार करा की, सध्या काही कुटुंबांमध्ये परदेशात जाऊन विवाह करण्याचे जे एक वातावरण तयार होत आहे, हे आवश्यक आहे का?" असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.
भारतीय उत्पादनांप्रति असलेली आपली भावना सण, उत्सवांपूरतीच मर्यादीत नसावी -
पंतप्रधान मोदी म्हणाले, भारतीय उत्पादनांप्रति असलेली आपली भावना केवळ सण आणि उत्सवांपूरतीच मर्यादीत नसावी, तर आता लग्नसराईचा काळही सुरू झाला आहे. काही व्यापरी संघटनांच्या मते या लग्नसराईच्या काळात जवळपास 5 लाख कोटी रुपयांचा व्यापार होऊ शकतो. लग्नाशी संबंधित खरेदीमध्येही आपण सर्वांनी भारतात तयार झालेल्या उत्पादनांनाच प्राधान्य द्यायला हवे. आणि हो, लग्नाचाच विषय निघाला आहे, तर एक गोष्ट मला बऱ्याच दिवसांपासून कधी-कधी त्रास देते आणि माझ्या मनातील गोष्ट, मी माझ्या कुटुंबासोबत बोलणार नाही, तर कुणाशी बोलणार?
देशाबाहेर जाऊन लग्न करणे आवश्यक आहे का? -
"आपण विचार करा की, सध्या काही कुटुंबांमध्ये परदेशात जाऊन विवाह करण्याचे जे एक वातावरण तयार होत आहे, हे आवश्यक आहे का? भारताच्या मातीत आणि भारतीय लोकांमध्ये आपण लग्न केले, तर देशातील पैसा देशातच राहील. देशातील लोकांना आपल्या लग्न समारंभात काही तरी करायची संधी मिळेल. छोटे-छोटे गरीब लोकही त्यांच्या मुलांना आपल्या लग्नातील गोष्टी सांगतील," असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 26 नोव्हेंबरच्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यासंदर्भात भाष्य करत, या हल्ल्यातील मृतांना आणि हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली. याच बरोबर, संविधान दिनानिमित्त देशवासियांना शुभेच्छाही दिल्या.