"बापूंचे विचार आजही जगात अत्यंत समर्पक", 'मन की बात'मधून मोदींनी केला जी-२० व चंद्रयान-३ चा उल्लेख
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2023 12:35 PM2023-09-24T12:35:54+5:302023-09-24T12:46:30+5:30
जी-२० परिषदच्यावेळी महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहण्यासाठी जगभरातील नेते राजघाटावर पोहोचले, तेव्हाचे ते दृश्य देश विसरू शकत नाही, असेही नरेंद्र मोदी म्हणाले.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. नरेंद्र मोदींच्या या विशेष कार्यक्रमाचा १०५ वा भाग आज प्रदर्शित झाला. यावेळी पंतप्रधानांनी जी-२० शिखर परिषद, चंद्रयान-३ चे यश आणि भारत-मध्य पूर्व आणि युरोप दरम्यान शिपिंग कॉरिडॉरच्या करारावर चर्चा केली. तसेच, जी-२० परिषदच्यावेळी महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहण्यासाठी जगभरातील नेते राजघाटावर पोहोचले, तेव्हाचे ते दृश्य देश विसरू शकत नाही, असेही नरेंद्र मोदी म्हणाले.
बापूंचे विचार आजही जगभर किती समर्पक आहेत याचा पुरावा म्हणजे राजघाटावर नेते एकत्र पोहोचणे हेच आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच, महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त देशभरात स्वच्छतेशी संबंधित अनेक कामांचे नियोजन करण्यात आल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की, १ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता स्वच्छतेचा एक मोठा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात देशभरातील लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
अलीकडेच युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळालेल्या कर्नाटकातील मंदिरांचाही पंतप्रधानांनी उल्लेख केला. कर्नाटकातील होयसडा मंदिरांचा जागतिक वारसा यादीत समावेश करण्याचा मोठा फायदा असल्याचे नरेंद्र मोदी म्हणाले. ही मंदिरे १३ व्या शतकात बांधण्यात आली. मंदिर बांधण्याच्या भारतीय परंपरेचा हा आदर आहे. आता भारतातील युनेस्कोच्या जागतिक वारशाची संख्या ४२ झाली आहे, असे नरेंद्र मोदींनी सांगितले.
जागतिक पर्यटन दिनानिमित्तही नरेंद्र मोदींनी भाष्य केले. ते म्हणाले की, काही लोक जागतिक पर्यटन दिनाच्या पर्यटनाकडे केवळ प्रेक्षणीय स्थळ म्हणून पाहतात. त्याचा संबंध रोजगाराशीही आहे. पर्यटन क्षेत्र सर्वाधिक रोजगार निर्माण करते. गेल्या काही वर्षांत भारताकडे आकर्षण वाढले आहे. आता कुठे कुठे गेलात तर भारतातील विविधता पहा आणि समजून घ्या, असा सल्ला नरेंद्र मोदींनी दिला.
अलीकडच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी सतत चंद्रयान-३, महिला आरक्षण आणि जी-२० शिखर परिषदेबद्दल बोलत आहेत. चंद्रयान-३ च्या यशाने त्यांनी मन की बात सुरू केली. नुकतेच संसदेच्या पाच दिवसांच्या अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्यात आले. हे विधेयक अद्याप राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी प्रलंबित आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदी महिला खासदारांसोबत दिसले आणि सरकारने त्यांच्या बाजूने केलेल्या कामाबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'मन की बात' कार्यक्रमाचे प्रसारण ऑल इंडिया रेडिओ, दूरदर्शन, पीएम ऑफिस, आयटी मंत्रालय, भाजपच्या सर्व सोशल मीडिया हँडल, यूट्यूब आणि नरेंद्र मोदींच्या वैयक्तिक यूट्यूब चॅनेलवर केले जाते. तसेच, मन की बात कार्यक्रम नरेंद्र मोदींच्या फेसबुक पेजवर प्रसारित केला जातो. तुम्ही पंतप्रधानांच्या फेसबुक पेजवरही ऐकू शकता.