Mann Ki Baat: हिंसा कुठल्याही समस्येवरचा उपाय नाही - नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 05:01 AM2020-01-27T05:01:58+5:302020-01-27T05:05:01+5:30
‘खेलो इंडिया’ आणि जलसंवर्धन अभियानात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.
नवी दिल्ली : ‘आपण एकविसाव्या शतकात आहोत. हे ज्ञान-विज्ञानाचे आणि लोकशाहीचे यूग आहे. हिंसा हा कुठल्याही समस्येवर उपाय नाही. चर्चा आणि शांततेच्या माध्यमातूनच समस्येचे निराकरण होऊ शकते. त्यामुळे काही शस्त्राच्या जोरावर समस्येवरचे समाधान शोधणाऱ्यांनी मुख्य प्रवाहात सामील व्हावे,’ असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवार) ‘मन की बात’च्या माध्यमातून केले.
‘अलीकडेच अतिरेकी संघटनांच्या ६०० लोकांनी हिंसेचा मार्ग सोडून आत्मसमर्पण केले आहे. काही कारणांनी शस्त्र हाती घेणारे हे लोक आता मुख्य प्रवाहात परतले आहेत. चर्चेतून मार्ग निघू शकतो, यावर त्यांचा विश्वास बसला आहे,’ असेही पंतप्रधान म्हणाले. जगाला भारताकडून ज्या अपेक्षा आहेत, त्या पूर्ण करण्याचे सामर्थ्य आपण नक्कीच प्राप्त करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
‘खेलो इंडिया’ आणि जलसंवर्धन अभियानात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले. ‘आसाममध्ये आयोजित ‘खेलो इंडिया’त सहा हजार खेळाडूंनी सहभाग घेतला आणि त्यात ८० विक्रम मोडीत निघाले. यात सर्वाधिक विक्रम मुलींच्या नावावर आहेत. गेल्या तीन वर्षांमध्ये या उपक्रमात सहभागी होणाऱ्यांची संख्या दुपटीने वाढली आहे. या माध्यमातून ३ हजार २०० खेळाडूंनी पुढे वाटचाल केली असून त्यांच्या कथाही प्रेरणादायी आहेत.’ स्वच्छता अभियानानंतर लोकसहभागाची भावना आता जल संवर्धनाच्या क्षेत्रातही वाढत आहे. त्यासाठी अनेक व्यापक आणि नवे प्रयत्न देशात सुरू आहेत. समाजातील प्रत्येक क्षेत्रातील व्यक्ती यात सहभाग घेत आहे, असेही ते म्हणाले.
ब्रू आदिवासींचा उल्लेख
‘अलीकडेच देश एका ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार ठरला. १९९७मध्ये वांशिक संघर्षामुळे ब्रू आदिवासींना मिझोराम सोडावे लागले होते. त्यांना त्रिपुरात शरणार्थी म्हणून ठेवण्यात आले. २३ वर्षांपर्यंत मुलभूत सुविधांपासून वंचित ठेवण्यात आले. कित्येक सरकार आले आणि गेले, पण त्यांच्या समस्यांची दखल घेतली नाही. तरीही त्यांचा भारतीय संविधानावर विश्वास होता. आता त्यांना त्रिपुरा येथे जागा आणि घर देण्यात येईल. त्यासाठी ६०० कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे,’ याचाही पंतप्रधानांनी आवर्जुन उल्लेख केला.