'हिज्बुल मुजाहिद्दीन'मध्ये सहभागी झालेल्या मन्नान वानीचा रूममेट बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 10:55 AM2018-01-09T10:55:32+5:302018-01-09T10:56:26+5:30
जम्मू काश्मीरमध्ये राहणारा बेपत्ता एएमयूचा विद्यार्थी मन्नान वानी याच्यासंदर्भातील प्राथमिक तपासात महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
अलीगड- जम्मू काश्मीरमध्ये राहणारा बेपत्ता एएमयूचा विद्यार्थी मन्नान वानी याच्यासंदर्भातील प्राथमिक तपासात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मन्नान वाणीचा रूममेट मुजम्मिल हुसैन जुलै 2017पासून बेपत्ता आहे. मुजम्मिल हुसैन जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामधील राहणार आहे. मन्नान वाणी हिज्बुलमध्ये सामिल झाला हे बोलणं आता घाईचं ठरेल, असं पोलिसांनी सांगितलं आहे.
मन्नान वाणी हिज्बुलमध्ये सामिल झाल्याच्या वृत्तानंतर यूपी एटीएसने सोमवारी दोन काश्मीरी विद्यार्थ्यांची कसून चौकशी केली. तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, हॉस्टेलमधील वानीच्या खोलीत संशयास्पद सामान सापडलं आहे. पुस्तकं, फोटो, पेन ड्राइव्हबरोबरच काही संशयास्पद कागदपस्त्र सापडली आहेत.
जम्मू-काश्मीरचे अतिरिक्त पोलीस महानिर्देशक मुनीर खान यांनी सांगितलं की, वानीच्या खोलीतून मिळालेल्या सामानाचा तपास सुरू आहे. वानीने 2017मध्ये हिज्बुलचं कॅलेंडर हॉस्टेलमध्ये वाटलं होतं, अशीही माहिती अलीगड पोलिसांना तपासात मिळाली आहे.
अलीगडचे एसएसपी राजेश पांडे यांच्या माहितीनुसार, वानीचा रूममेट हुसैन गेल्यावर्षी जुलै महिन्यापासून हॉस्टेलमध्ये परतला नाही. मन्नानला 2 जानेवारीला शेवटचं पाहिलं होत, असं हॉस्टेलच्या मेस चालविणाऱ्या व्यक्तीने सांगितलं. मन्नान वाणीला अलीगड मुस्लीम युनिव्हर्सिटीमधून निलंबित करण्यात आलं आहे. दोन दिवस आधी त्याचा हातात रायफल घेऊन फोटो व्हायरल झाला होता. 5 जानेवारी रोजी तो हिज्बुलमध्ये सहभागी झाल्याचं फोटोवर म्हंटलं होतं.
एएमयूच्या पीआरओंनी दिलेल्या माहितीनुसार, भूगर्भ शास्त्राचा रिसर्च स्कॉलर मन्नान बशीर वानीला संस्थेन निलंबित केलं आहे. तसंच हबीब हॉल हॉस्टेलमधील त्याची खोली सील केली गेली आहे.
कोण आहे मन्नान वाणी ?
मन्नान वानी (वय 26) जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील हा तरूण आहे. ५ जानेवारी रोजी तो हिज्बुल मुजाहिद्दीन या संघटनेत सामील झाला आहे. अलीगड मुस्लीम विश्वविद्यालयातून तो पीएचडीचं शिक्षण घेत होता. विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइटनुसार मन्नान वाणी हा 'स्ट्रक्चरल अॅण्ड जिओ-मोरफोलॉजिकल स्टुडी ऑफ लोबल व्हॅली, काश्मीर' या विषयावर पीएचडी करत होता. वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार. मन्नानला 2016 मध्ये ‘जल, पर्यावरण आणि समाज’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत सर्वोत्तम रिसर्च पेपर सादर केल्याबद्दल पुरस्कार मिळाला होता. त्याने काश्मीर विद्यापीठातून भूगर्भ शास्त्रात पदवी घेतली होती. यानंतर त्याने पदव्यूत्तर शिक्षण अलीगड विद्यापीठातून घेतलं.