सीमा लढ्यातील ज्येष्ठ कार्यकर्ते मनोहर भातकांडे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 04:44 AM2018-06-23T04:44:58+5:302018-06-23T04:45:04+5:30
महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते, सीमातपस्वी मनोहर महादेवराव भातकांडे (९२, रा. पांगुळ गल्ली, बेळगाव) यांचे शुक्रवारी वृद्धापकाळाने निधन झाले.
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते, सीमातपस्वी मनोहर महादेवराव भातकांडे (९२, रा. पांगुळ गल्ली, बेळगाव) यांचे शुक्रवारी वृद्धापकाळाने निधन झाले. बेळगावचे पहिले नगराध्यक्ष स्वर्गीय गजाननराव भातकांडे यांचे ते कनिष्ठ बंधू होत.
तरुणवयापासून भातकांडे सामाजिक कार्यात सहभागी होते. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा आंदोलनाच्या पहिल्या लढ्यापासून ते सक्रिय होते. सीमाप्रश्नावरील अनेक पोवाड्यांचीदेखील रचना त्यांनी केली होती. बेल्लारीमध्ये त्यांनी कारावास भोगला होता. बेळगाव येथील शिवजयंती उत्सवात ते नेहमीच हिरीरीने भाग घेत होते.
मराठीसाठी झटणाऱ्या या कार्यकर्त्यास बेळगाव व परिसरातील नागरिकांसह समिती कार्यकर्त्यांनी श्रद्धांजली वाहिली. त्यांच्यावर सदाशिवनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.