पर्रीकरांना अमेरिकेतही अफवा कळायच्या तेव्हा...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2018 10:13 PM2018-09-07T22:13:59+5:302018-09-07T22:14:49+5:30
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे उपचारासाठी अमेरिकेत होते. त्यावेळी त्यांना विश्वजित राणे एकदाच भेटले होते.
- सदगुरू पाटील
पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे अमेरिकेत होते, तेव्हा गोव्यातील सगळ्या राजकीय अफवांबाबतची माहिती त्यांच्यापर्यंत पोहचत असे. कधी काँग्रेसचे तर कधी भाजपचे आमदार फुटले, कधी दिगंबर कामत भाजपमध्ये जातील तर कधी नेतृत्व बदल होईल, अशा प्रकारच्या अफवांचे पिक गोव्यात आले होते. पर्रीकरांना त्यांच्या सेवेतील वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांकडून सगळ्य़ा अफवा कळायच्या. शेवटी पर्रीकर यांनी अफवांवर विश्वास ठेवू नका, गोव्यात कुणाला किती रोंबाट घालायचे आहे ते घालू द्या, असा सल्ला अधिकाऱ्यांसह सर्वानाच दिला.
पर्रीकर यांच्याबरोबर उपेंद्र जोशी हे वरिष्ठ अधिकारी अमेरिकेला गेले होते. जोशी हे मुख्यमंत्र्यांच्याच कार्यालयात काम करतात. पर्रीकर यांना रोज इस्पितळात रहावे लागत नव्हते. ते उपचार घ्यायचे व मग त्यांना दिल्या गेलेल्या अपार्टमेन्टमध्ये रहायचे. रोज त्यांच्याकडे गोव्याहून भुषण सावईकर या वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याकडून 5 फाईल्सची यादी जायची. ती यादी अमेरिकेत उपस्थित अधिकारी जोशी यांनी वाचून दाखविल्यानंतर मग फाईल्स मंजूर करणे किंवा अन्य निर्णय घेण्याबाबतचा सोपस्कार पार पाडला जात असे. या कालावधीत गोव्यातील राजकीय अफवाही पर्रीकर यांना कळायच्या. ब:याच अफवा ऐकून झाल्यानंतर त्यांनी शेवटी अफवांवर जाऊ नये, कुणाला किती रोंबाट घालायचे आहे ते घालू द्या असा सल्ला अधिकाऱ्यांना दिला.
अमेरिकेत गोवा सरकारमधील एक मंत्री विश्वजित राणे हे मुख्यमंत्री पर्रीकर यांना एकदाच भेटले. मंत्री राणे हेही त्याच कालावधीत आपल्या एका कामासाठी अमेरिकेला गेले होते. दिगंबर कामत भाजपमध्ये फेरप्रवेश करणार असल्याची अफवाही पर्रीकर यांना समजली पण त्यांनी दुर्लक्ष केले. भाजप पश्रश्रेष्ठी एकतर्फी निर्णय घेणार नाहीत याची कल्पना त्यांना असल्याने त्यांनी अफवा गंभीरपणे घेतल्या नाहीत, असे सुत्रांनी सांगितले.