मनोहर पर्रिकर होणार गोव्याचे मुख्यमंत्री ?

By admin | Published: March 12, 2017 10:15 AM2017-03-12T10:15:39+5:302017-03-12T12:15:47+5:30

केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर पुन्हा गोव्यात परतणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून लोकमतला मिळाली

Manohar Parrikar will be Goa Chief Minister? | मनोहर पर्रिकर होणार गोव्याचे मुख्यमंत्री ?

मनोहर पर्रिकर होणार गोव्याचे मुख्यमंत्री ?

Next

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 12 - केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर पुन्हा गोव्यात परतणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून लोकमतला मिळाली आहे. मनोहर पर्रिकर गोव्याचे मुख्यमंत्री झाल्यास मगो, गोवा फॉरवर्ड पक्ष भाजपासोबत येण्यास तयार झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गोव्यात भाजपाचं निर्विवाद वर्चस्व होतं. मात्र पर्रिकर केंद्रात आल्यापासून गोवा भाजपाला कोणी वाली उरला नव्हता. गोव्यातील भाजपाचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकरांसह एकूण सहा मंत्र्यांना निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. मंत्री महादेव नाईक, दिलीप परुळेकर, दयानंद मांद्रेकर, आवेर्तान फुर्तादो, राजेंद्र आर्लेकर यांचा पराभव झाला आहे. 

गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नसले तरी 40 सदस्यीय विधानसभेत काँग्रेस 17 जागा मिळवून सर्वांत मोठा पक्ष समोर आला आहे. त्यामुळे भाजपाच्या पायाखालची जमीन सरकली आहे. भाजपाला 13 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. तर कधी नव्हे ते राष्ट्रवादीनंही 1 जागा पटकावत गोव्यात खातं उघडलं आहे. महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाला 3 जागी विजय मिळाला आहे. तर गोवा फॉरवर्ड पार्टीनं 3 जागा जिंकल्या आहेत. इतर 3 जागा अपक्षांच्या पारड्यात गेल्या आहेत. विशेष म्हणजे वेलिंगकर यांचा गोवा सुरक्षा मंच आणि शिवसेनेला एकही जागा जिंकता आली नाही. त्यामुळे गोवा राज्यात सत्ता समीकरण जुळवण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील असतानाच भाजपाकडून केंद्रातून मनोहर पर्रिकर यांना परत गोव्यात मुख्यमंत्री म्हणून पाठवण्यात येणार असल्याची चर्चा आहे. 
(गोव्यात भाजपाला धक्का; काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष)
मनोहर पर्रिकर सत्ता समीकरण जुळवून गोव्यातली सत्ता अबाधित राखतील, असा भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाला विश्वास आहे. तसेच गोवा विधानसभा निवडणुकीत पाच माजी मुख्यमंत्री विजयी झाले, तर तिघा अपक्षांनी बाजी मारली. गोव्यात भाजपाशिवाय पर्याय नाही, आम्ही महिलांसाठी प्रचंड योजना राबविल्या असून, गोव्याचा विकास केल्याचा दावा करणा-या भाजपाची 21 जागांवरून 13 जागांवर घसरगुंडी झाली. भाजपानं 23 ते 26 जागा जिंकण्याचा केलेला दावाही फोल ठरला आहे. विशेष म्हणजे प्रत्येक मतदारसंघात भाजपाने प्रचंड पैसा निवडणुकीवेळी खर्च केला. हाती पोलीस यंत्रणादेखील होती तरीसुद्धा मतदारांनी भाजपाला झिडकारून काँग्रेसला संधी देण्याचा विचार केला आहे. मात्र अद्यापही सत्ता समीकरणांचा तिढा कायम आहे. त्यामुळे पर्रिकर गोव्यात परतून भाजपाची सत्ता परत आणतात का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Web Title: Manohar Parrikar will be Goa Chief Minister?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.