खट्टर यांचा राजीनामा, आता हरयाणामध्ये कोण होणार नवा मुख्यमंत्री? ही दोन नावं चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 01:34 PM2024-03-12T13:34:20+5:302024-03-12T13:34:51+5:30
Haryana Politics: हरयाणामध्ये आज घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आता राज्यामध्ये नव्याने मंत्रिमंडळाची स्थापना होणार आहे.
हरयाणामध्ये आज घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आता राज्यामध्ये नव्याने मंत्रिमंडळाची स्थापना होणार आहे. राज्यातील भाजपा आणि जेजेपी यांच्यातील आघाडी तुटली आहे. आता काही बंडखोरांच्या पाठिंब्याने भाजपाने बहुमताची जुळवणी केली आहे. भाजपाच्या विधानसभा सदस्यांची बैठक बोलावण्यात आली असून, त्यामध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होणार आहे. या बैठकीपूर्वी राज्यातील पक्षाचे निरीक्षक अर्जुन मुंडा आणि तरुण चुग हे चंडीगडकडे रवाना झाले आहेत. या बैठकीनंतर तातडीने नव्या सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या राज्यातून दोन नव्या शक्यता समोर येत आहेत. एक म्हणजे मनोहरलाल खट्टर हेच पुन्हा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेऊ शकतात. दुसरी म्हणजे खट्टर यांच्या जागी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष नायब सिंह सैनी किंवा संजय भाटिया यांच्यापैकी एकाची मुख्यमंत्रिपदी निवड होऊ शकते.
नायब सिंह सैनी हरयाणा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. तसेच ते ओबीसी समाजाशी संबंधित आहेत. नायब सिंह यांचा राजकीय प्रवास पाहिल्यास ते २००५ मध्ये भाजपा युवा मोर्चाचे अंबाला येथील जिल्हाध्यक्ष बनले. त्यानंतर २००९ मध्ये ते भाजपा किसान मोर्चाचे हरियाणामधील महामंत्री बनले. २०१२ मध्ये अंबाला येथील जिल्हाध्यक्ष बनले. २०१४ मध्ये ते नारायणगड विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. २०१६ मध्ये ते खट्टर सरकारमध्ये मंत्री बनले. तर २०१९ मध्ये कुरुक्षेत्र येथून खासदार म्हणून निवडून आले होते.
तर संजय भाटिया हे भाजपाचे करनाल लोकसभा मतदारसंघातील खासदार आहेत. ते पानीपतमधील मॉडल टाऊन येथील रहिवासी आहेत. त्यांनी भाजपाच्या पक्ष संघटनेमध्ये विविध पदांवर काम पाहिले आहे,. १९८९ मध्ये ते एबीव्हीपीचे जिल्हा सरचिटणीस बनले होते. १९९८ मध्ये ते भाजयुमोचे राज्य सरचिटणीस बनले. तर २०१९ मध्ये करनाल येथून आमदार म्हणून निवडून आले होते.
हरयाणा विधानसभेतील संख्याबळ पाहिल्यास ९० सदस्यसंख्या असलेल्या हरयाणा विधानसभेमध्ये बहुमताचा आकडा ४६ आहे. भाजपाकडे ४१ आमदार आहेत. तर काँग्रेसकडे ३०, जेजेपीकडे १०, आयएनएलडीकडे १, हरयाणा लोकहित पार्टीकडे १ आणि ६ अपक्ष आमदार आहेत.