मनोज कुमार यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
By admin | Published: March 4, 2016 04:37 PM2016-03-04T16:37:46+5:302016-03-04T17:29:02+5:30
महान अभिनेते मनोज कुमार यांना यंदाचा प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्याचे वृत्त आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ४ - हरीयाली और रास्ता, वो कौन थी, हीमालय की गोद में, उपकार, नील कमल, पूरब और पश्चिम आणि क्रांती या चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची छाप उमटवणारे महान अभिनेते मनोज कुमार यांना यंदाचा प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील हा सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. मनोज कुमार यांनी अभिनय तर केलाच पण त्याचबरोबर ते यशस्वी दिग्दर्शकही होते. त्यांनी अनेक देशभक्तीपर चित्रपटांची निर्मितीही केली. १९९२ साली भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले.
मनोज कुमार यांच्या हिंदी चित्रपटातील प्रवासाला १९५७ साली सुरुवात झाली. १९५७ साली फॅशन चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यानंतर १९६० साली कांच की गुडिया चित्रपटात मनोज कुमार यांना मुख्य भूमिका मिळाली. या चित्रपटानंतर त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत स्वत:ला प्रस्थापित केले आणि त्यांचा यशाच्या दिशेने प्रवास सुरु झाला. १९६५ साली आलेल्या शहीद चित्रपटापासून त्यांची राष्ट्रभक्त नायक अशी नवी ओळख निर्माण झाली.
उपकार हा १९६७ साली त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट. देशभक्तीवर आधारीत या चित्रपटात त्यांनी सैनिक आणि शेतकरी अशी दुहेरी भूमिका केली. आजही अनेकांच्या ओठावर येणारे 'मेरे देश की धरती' हे गाणे या चित्रपटातील आहे. मनोज कुमार यांनी आपल्या चित्रपटातून देशभक्तीपर नायक रंगवल्याने भारत कुमार ही नवी ओळख त्यांना मिळाली.
१९८० मध्ये क्रांती चित्रपटानंतर त्यांची कारकीर्द उतरणीला लागली. मनोज कुमार यांचा जन्म २४ जुलै १९३७ रोजी पाकिस्तानातील अबोटाबादमध्ये झाला. हरीकिशन गिरी गोस्वामी हे मनोज कुमार यांचे मूळ नाव होते. मनोजकुमार १० वर्षांचे असताना फाळणीच्यावेळी त्यांचे कुटुंब दिल्लीत आले. दिल्ली विद्यापीठातील हिंदू कॉलेजमधून पदवी घेतल्यानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीत कारकीर्द करण्याचा निर्णय घेतला. १९५७ साली फॅशन चित्रपटात त्यांना छोटीशी भूमिका मिळाली. मात्र कांच की गुडिया चित्रपटापासून त्यांनी स्वत:ची ओळख निर्माण केली.