28 वर्षांनंतर एनडीएचे वर्गमित्र होणार तीन सेनांचे प्रमुख, वायुसेनेत होते तिघांचे वडील
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2019 11:24 AM2019-12-18T11:24:16+5:302019-12-18T14:46:02+5:30
लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे लवकरच नवे लष्करप्रमुख होणार आहेत.
नवी दिल्लीः लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे लवकरच नवे लष्करप्रमुख होणार आहेत. जनरल बिपीन रावत सेवानिवृत झाल्यानंतर 13 लाखांची क्षमता असलेल्या लष्कराची ते धुरा सांभाळणार आहेत. लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत. ऑपरेशन आणि कमांडचा प्रदीर्घ अनुभव असलेले नरवणे जनरल बिपीन रावत यांच्यानंतर कार्यभार स्वीकारणार आहेत.
मनोज मुकुंद नरवणे, एअर चीफ मार्शल आर. के. एस. भदोरिया आणि नौदल प्रमुख करमबीर सिंह यांनी 1976मध्ये राष्ट्रीय संरक्षण अकादमी(एनडीए)चा 56वा कोर्स एकत्र केला होता. भारतीय लष्कराच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं झालं आहे. जेव्हा तिन्ही सेनांचे प्रमुख एनडीएचे 1976च्या बॅचचे क्लासमेट आहेत.
तत्पूर्वी 1991मध्ये तत्कालीन लष्कर प्रमुख सुनीत फ्रान्सिस रॉड्रिग्ज, नौदल प्रमुख ऍडमिरल लक्ष्मी नारायण रामदास आणि एअर चीफ मार्शल निर्मल चंद्र सुरी या तीन क्लासमेटनी तिन्ही सेनांचं नेतृत्व केलं होतं. ज्यांनी एनडीएचा कोर्स एकत्र केला होता. लेफ्टनंट जनरल नरवणे 13वे लष्करप्रमुख आहेत. ज्यांनी एनडीएचा कोर्स केलेला आहे. त्याशिवाय एनडीएमध्ये शिकणाऱ्या 11 कॅडेट्सनी नौदलाची आणि नऊ कॅडेट्सनं हवाई दलाची धुरा सांभाळली आहे. इतर सेना प्रमुखांनी भारतीय सैन्य अकादमी, वायुसेना अकादमी आणि नौसेना अकादमीतून शिक्षण घेतलं आहे.
कोण आहेत मनोज नरवणे ?
नरवणे मूळचे पुण्याचे आहेत. त्यांचे शालेय शिक्षण 'ज्ञानप्रबोधिनी'त झालं आहे. महाविद्यालयीन शिक्षणानंतर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर ते जून 1980 ' 7 शीख लाइट इन्फंट्री'मधून लष्करात रुजू झाले. आसाम रायफलचे उत्तर-पूर्व विभागाचे 'इन्स्पेक्टर जनरल', स्ट्राइक कोअरचे दिल्ली क्षेत्रातील 'जनरल ऑफिसर इन कमांडिंग', लष्कर प्रशिक्षण विभागाचे प्रमुख, महू स्थित लष्कर युद्धशास्त्र महाविद्यालयात प्रशिक्षक अशा अनेक पदांवर काम करताना त्यांनी ठसा उमटवला. युद्ध, शांतताकालीन आणि दहशतवादी कारवायांनी धुमसणाऱ्या अशा तिन्ही प्रकारच्या क्षेत्रांत काम करण्याचा अनुभव नरवणेंना आहे. प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपले कौशल्य, वेगळेपण सिद्ध केलं आहे. त्यांच्या या कामगिरीची वेळोवेळी दखल घेण्यात आली. परमविशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदक, सेना पदक, विशिष्ट सेना पदकाने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे.