India China Border: मोदी सरकारचा मोठा निर्णय! चीन सीमेवर ताकद वाढवली; लष्कराच्या आणखी ६ तुकड्या तैनात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 12:13 PM2022-05-16T12:13:10+5:302022-05-16T12:14:08+5:30
भारत-चीन सीमा संघर्ष दोन वर्षांपासून सुरू असून, अद्यापही तेथे ३५ हजारांहून जास्त जवान तैनात करण्यात आले आहेत.
नवी दिल्ली: एकीकडे कोरोनाचा कहर सुरू असताना दुसरीकडे भारत-चीन सीमा (India China Border Dispute) संघर्ष तीव्र झाला होता. लडाख येथे दोन्ही सैन्यात रक्तरंजित झटापट झाली. यात भारतीय जवानांना हौतात्म्य आले. चीनचेही अनेक सैनिक मारले गेले. यानंतर भारत आणि चीन या दोन्ही देशात चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. मात्र, त्यातून काही निष्पन्न झाले नाही. अद्यापही दोन्ही देशांत वार्तालाप सुरू असल्याचे सांगितले जाते. यातच भारत-चीन सीमा सुरक्षा परिस्थितीबाबत लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी मोठे पाऊल उचलले आहे. लडाख भागात लष्कराच्या सहा नव्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
चीन सीमेवरील वाढता धोका लक्षात घेता प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (LAC) सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. या तुकड्या आगोदर दहशतवादविरोधी भूमिका आणि पाकिस्तानवर लक्ष ठेवण्यासाठी तैनात करण्यात आल्या होत्या. गेल्या दोन वर्षांत या लष्कराच्या दोन तुकड्या म्हणजेच सुमारे ३५ हजार सैनिक चीनच्या सीमेवर तैनात करण्यात आले आहेत.
लष्कराकडून सैन्याची पुनर्रचना
चीनसोबत भारताचा सीमावाद दोन वर्षांहून अधिक काळापासून सुरू आहे, तेव्हा चिनी सैन्याने भारतीय चौक्यांवर मोठ्या प्रमाणात आपले सैनिक तैनात केले होते. त्यानंतर आता भारतीय लष्कर आपल्या सैन्याची पुनर्रचना करत आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानकडून येणार्या आव्हानांना आणि धोक्यांना तोंड देण्यासाठी अगोदर उत्तरेकडील सीमेवर ज्या तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. त्यांना आता चीनच्या सीमेवर तैनात करण्यात आले आहे. याशिवाय, राष्ट्रीय रायफल्सची एक तुकडी जम्मू-काश्मीरमधून बंडखोरीविरोधी कारवायांवर लक्ष ठेवण्यासाठी तैनात करण्यात आली होती. आता त्या तुक़डीला पूर्व लडाख सेक्टरमध्ये तैनात करण्यात आले आहे.
चीनला थेट संदेश देण्याचा भारताचा प्रयत्न
तेजपूर येथील गजराज कॉर्प्सच्या अंतर्गत आसाममधील एक तुकडी राज्यातील बंडविरोधी कारवाया रोखण्यासाठी तैनात करण्यात आली होती. मात्र, आता त्या तुकडीला भारत-चीनच्या ईशान्य सीमेवर तैनात करण्यात आले आहे. लष्कराची तुकडी कमी केल्यामुळे आता आसाममध्ये दहशतवादविरोधी कारवायांवर लक्ष ठेवण्यासाठी कोणतीही तुकडी नसल्याचे समोर आले आहे. दरम्यान, दोन वर्षांपूर्वी लडाख सेक्टरमध्ये भारतीय लष्कराची चिनी लष्कराशी चकमक झाली होती. भारताने LAC वर एवढ्या मोठ्या संख्येने सैन्य तैनात केल्याने LAC वर घुसखोरीचा कोणताही प्रयत्न शक्य होणार नाही, असा संदेश चिनी लष्करालाही गेला आहे. चीनने भारतीय सीमेवर मोठ्या प्रमाणात आपले सैन्य तैनात केल्यानंतर, भारतानेही त्याच पद्धतीने सैन्य तैनात केले आहे.