दिल्ली भाजपा प्रदेशाध्यक्षांवर हल्ला, थोडक्यात बचावले मनोज तिवारी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2017 08:39 AM2017-08-20T08:39:33+5:302017-08-20T08:42:41+5:30
भाजपाचे नवी दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांच्यावर अज्ञात लोकांनी हल्ला केला आहे. काल शनिवारी त्यांच्यावर एका कार्यक्रमात हा हल्ला झाला. या हल्ल्यात ते थोडक्यात बचावले आहेत
नवी दिल्ली, दि. 20 - भाजपाचे नवी दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांच्यावर अज्ञात लोकांनी हल्ला केला आहे. काल शनिवारी त्यांच्यावर एका कार्यक्रमात हा हल्ला झाला. या हल्ल्यात ते थोडक्यात बचावले आहेत. या सर्व घटनेची पोलिस चौकशी करत आहेत.
भाजपा प्रवक्ताने दिलेल्या माहितीनुसार, बवाना येथील निवडणुक प्रचाराच्या बैठकत प्रचार करत असताना मनोज तिवारी यांच्यावर काही अज्ञांत लोकांनी हल्ला केला. मनोज तिवारी यांच्यावर दगडफेक आणि लाकडाच्या दांड्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. विरोधकांना त्यांचा पराभव समोर दिसत असल्यामुळे त्यांनी हे कृत्य केल्याचा आरोपही भाजपाच्या प्रवक्याने केला आहे. या हल्ल्यातून मनोज तिवारी सुखरुप बचावले आहेत.
डीसीपी ऋषिपाल सिंह यांनी सांगितले की, शनिवारी रात्री मनोज तिवारी यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार तिवारी यांच्यावर लाकडाच्या तुकडे आणि दगडफेक केली. या सर्व घटनेची पोलिसांमध्ये तक्रार आली असून अज्ञांतावर गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळाच्या मिळालेल्या व्हिडिओ फुटेजनुसार या घटनेची चौकशी सुरु आहे.
23 ऑगस्ट रोजी बवानामध्ये निवडणुका होत आहेत. त्यासाठी प्रत्येक पक्ष आपली ताकद पणाला लावून प्रचार करत आहेत. या जागेसाठी भाजपाकडून वेद प्रकाश मैदानात आहेत. वेद प्रकाश यांनी आम आदमी पार्टीमधून भाजपात प्रवेश केला आहे.
दरम्यान , मनोज तिवारी यांच्यावर हल्ला होण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी दिल्लीतील 159 नॉर्थ अव्हेन्यू परिसरात खासदार मनोज तिवारी यांच्या घरावर हल्लेखोरांनी हल्ले केले आहेत. खासदार तिवारी हे घरी नव्हते, यावेळी हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात २ जण गंभीर झाले. दरम्यान याबाबतची माहिती खासदार तिवारी यांनी ट्विट करुन दिली होती. खासदार तिवारी यांनी हा हल्ला म्हणजे मोठा कट असून या हल्ल्यात पोलिसांचा सहभाग असल्याचा गंभीर आरोपही ट्विटद्वारे केला. तर घटनास्थळावर उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी हल्ला का झाला हे सांगता येत नाही, मात्र हल्लेखोर घाण शिव्या देत होते. त्यांना पोलिसांची भीती नसल्याचेही त्यांच्या बोलण्यावरुन वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.