मनोरुग्ण सुरक्षा विधेयक मंजूर

By admin | Published: August 10, 2016 03:55 AM2016-08-10T03:55:06+5:302016-08-10T03:55:06+5:30

मनोरूग्णावस्थेत आत्महत्येचा प्रयत्न करणे यापुढे गुन्हा ठरणार नाही. अशा प्रकरणात मानसिक रूग्णावस्थेने ग्रस्त व्यक्तिवर आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करता येणार नाही

Manorax Protection Bill Approved | मनोरुग्ण सुरक्षा विधेयक मंजूर

मनोरुग्ण सुरक्षा विधेयक मंजूर

Next

सुरेश भटेवरा, नवी दिल्ली
मनोरूग्णावस्थेत आत्महत्येचा प्रयत्न करणे यापुढे गुन्हा ठरणार नाही. अशा प्रकरणात मानसिक रूग्णावस्थेने ग्रस्त व्यक्तिवर आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करता येणार नाही, हा महत्वपूर्ण आशय अधोरेखित करणारे तसेच मनोरूग्णांच्या सुविधा व अधिकारांवर भर देणारे, मनोरूग्ण सुरक्षा व अधिकार दुरूस्ती विधेयक राज्यसभेत १३४ दुरूस्त्यांसह मंजूर झाले.
मनोरूग्णांच्या सुरक्षेबाबत चिंता करणारे प्रस्तुत दुरूस्ती विधेयक प्रगतीशील विधेयक असल्याचा उल्लेख करीत आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा म्हणाले, पूर्वीच्या कायद्यात नियमनावर अधिक भर देण्यात आला होता तर दुरूस्ती विधेयकात मनोरूग्णांना अधिकाधिक सुविधा कशा देता येतील तसेच त्यांच्या अधिकारांबाबत विशेष जागरूकतेने भर देण्यात आला आहे. विधेयकातील तरतूदींनुसार मनोरूग्णांवर आवश्यकतेनुसार उपचार केले जातील. महिला व लहान
मुलांच्या उपचारासाठी स्वतंत्र व्यवस्था असेल. मानसिक दृष्टया आजारी रूग्णाला रूग्णालयात ३0 दिवस
ठेवता येईल. तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ९0 दिवसांपर्यंत ही मुदत वाढवताही येईल.
मानसिक रूग्णांच्या उपचारासाठी देशात सुयोग्य डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांची कमतरता आहे, ही बाब लक्षात घेउन वैद्यकीय अभ्यासक्रमात मनोरूग्ण चिकि त्सा अभ्यासक्रमाच्या जागाही वाढवण्यात आल्या आहेत.

उत्तरादाखल केलेल्या भाषणात आरोग्यमंत्री नड्डा म्हणाले, देशात मानसिक रूग्णांची संख्या नेमकी किती याचा शोध घेण्यासाठी बंगलुरूच्या निमहान्स संस्थेने सर्वेक्षण सुरू केले आहे.
या सर्वेक्षणासाठी देशाची विभागणी ६ प्रभागांमधे करण्यात आली आहे. प्राथमिक अंदाजानुसार देशात एकुण लोकसंख्येपैकी ६ ते ७ टक्के लोक मानसिक आजाराने कमी अधिक प्रमाणात ग्रस्त असल्याचा अंदाज आहे. यापैकी २ टक्के रूग्ण गंभीर मानसिक आजाराने ग्रस्त आहेत.
विधेयकावरील चर्चेत काँग्रेसच्या मधुसूदन मिस्त्रींनी देशात मनोरूग्णांची विश्वासार्ह आकडेवारी उपलब्ध नसल्याचा उल्लेख केला तसेच मनोरूग्णांच्या उपचार प्रक्रियेत वीजेचे शॉक देण्याचा अघोरी उपाय बंद करण्याचा व मनोरूग्ण चिकि त्सालये तथा रूग्णालयांमधे तज्ज्ञ डॉक्टर्सचे संख्याबळ वाढवण्याचा आग्रह धरला.
विधेयकावर बोलतांना भाजपचे डॉ. विकास महात्मे म्हणाले, शारिरिक आजारांच्या उपचारांकडे लोक सर्वाधिक लक्ष देतात मात्र मानसिक आजारांकडे दुर्लक्ष करतात, ही अतिशय गंभीर बाब आहे.

Web Title: Manorax Protection Bill Approved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.