Mansoon Updates: गुड न्यूज! अखेर मान्सून केरळात दाखल; २-३ दिवसांत महाराष्ट्रात बरसणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2022 12:35 PM2022-05-29T12:35:36+5:302022-05-29T12:36:26+5:30
केरळमध्ये काही दिवस जोरदार पाऊस, वादळी वारे वाहणार असल्याची शक्यता आहे. केरळमध्ये आज किमान २५ डिग्री तर कमाल ३१ डिग्री से. तापमान आहे.
मुंबई - मान्सूनबाबत हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला आहे. २९ मे रोजी मान्सूननं केरळात जोरदार एन्ट्री घेतली आहे. IMD नुसार सामान्य तारखेच्या ३ दिवसआधीच मान्सूननं केरळात हजेरी लावली आहे. त्यामुळे यंदा समाधानकारक पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आता येणाऱ्या २-३ दिवसांत केरळसह कर्नाटक, महाराष्ट्रातही पावसाला सुरूवात होणार आहे.
हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे बंगालच्या खाडीत आलेल्या चक्रीवादळामुळे वेळेपूर्वीच मान्सून दाखल होण्याची शक्यता होती. वेळेपूर्वीच मान्सून १६ मे रोजी अंदमान आणि निकोबार बेटावर पोहचला होता. वादळामुळे पावसाचे ढग वेगाने पुढे सरकत होते. २९ मे ते १ जून दरम्यान केरळमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर लक्षद्विपमध्ये ३० मे रोजी मुसळधार पाऊस पडू शकतो. मान्सूनपूर्वी केरळच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळला होता.
केरळमध्ये पुढील काही दिवस पावसाचे वातावरण असेच राहणार आहे. केरळमध्ये काही दिवस जोरदार पाऊस, वादळी वारे वाहणार असल्याची शक्यता आहे. केरळमध्ये आज किमान २५ डिग्री तर कमाल ३१ डिग्री से. तापमान आहे. बिहार, झारखंडच्या अनेक भागात आज पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवस या राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई परिसरातही सकाळपासून काही भागात रिमझिम पाऊस पडत होता. अनेक भागात ढगाळ वातावरण असून याठिकाणीही पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Southwest Monsoon has set in over Kerala today, the 29th May against the normal date of onset, the 1st June.
— India Meteorological Department (@Indiametdept) May 29, 2022
Thus the Southwest Monsoon has set in over Kerala three days ahead of its normal date.
Detailed press release will be available soon.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे होते. कोकण, गोवा व विदर्भात काही ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले. मुंबईत सद्यस्थितीमध्ये ढगाळ हवामानाची किंचित नोंद होत असून, उकाडा मात्र सातत्याने घाम काढत आहे. मुंबईचे कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आहे, तर आर्द्रता कमी अधिक फरकाने ६० टक्क्यांवर नोंदविण्यात येत आहे.