मनूचा मनुस्मृतीशी अर्थाअर्थी संबंध नाही, संस्कार भारतीचा दावा
By admin | Published: May 10, 2017 08:54 PM2017-05-10T20:54:49+5:302017-05-10T20:54:49+5:30
मनुस्मृती’च्या निमित्ताने मनुवर टीकेची झोड उठवणाऱ्या भारतातल्या विविध राजकीय पक्षांनी ज्याप्रकारे आजवर मनुला अकारण बदनाम केले,
ऑनलाइन लोकमत/सुरेश भटेवरा
नवी दिल्ली, दि. 10 - ‘मनुस्मृती’च्या निमित्ताने मनुवर टीकेची झोड उठवणाऱ्या भारतातल्या विविध राजकीय पक्षांनी ज्याप्रकारे आजवर मनुला अकारण बदनाम केले, तो एकतर्फी प्रयोग रा.स्व.संघाच्या संस्कार भारतीला मान्य नाही. अर्धवट माहिती व अपुऱ्या ज्ञानाच्या आधारे मनुवर ही टीका होत असल्याचा दावा करीत, संस्कार भारतीने मनुच्या उजळ बाजूचे सत्य प्रकाशात आणण्याचा तसेच मनुच्या व्यक्तिमत्वाचे मेकओव्हर करून जनतेचे या संदर्भातले सारे भ्रम दूर करण्याचा निर्धार केला आहे.
मनुस्मृती व वेदांमधील काही संकल्पनांंबाबतचा अपप्रचार दूर करण्यासाठी केंद्रीय संस्कृती मंत्रालयानेही तज्ज्ञ इतिहासकारांमार्फत संशोधन करावे व सत्य जगासमोर आणावे, असा आग्रह संस्कार भारतीचे सह संघटनमंत्री अमीरचंद यांनी केला आहे. मनुस्मृतीचा कालखंड आजपासून 1800 ते 2400 वर्षे जुना आहे तर मनुचा जन्म 8000 वर्षांपूर्वी झाल्याचे बहुतांश इतिहासतज्ज्ञ मानतात, असे नमूद करीत अमीरचंद म्हणतात, मनुच्या जन्मानंतर तब्बल 5 हजार वर्षांनी अस्तित्वात आलेल्या मनुस्मृतीवरील टीकेचे खापर मनुवर फोडणे सर्वथा अयोग्य व अन्यायकारक आहे. त्याचबरोबर अमीरचंद हे देखील मान्य करतात की मनुस्मृतीत अशा अनेक गोष्टींचा उल्लेख आहे. व्यापक समाजहित लक्षात घेता तो योग्य नाही. आगामी पिढ्यांपर्यंत फक्त चांगल्या गोष्टीच पोहोचाव्यात यासाठी मनुस्मृतीतल्या वादग्रस्त गोष्टी दुरुस्ती घडवून बाद केल्या पाहिजेत.
मनुच्या इतिहासकालीन व्यक्तिमत्वाबरोबरच वेदांमधील काही संकल्पनांबाबतही जनतेत भ्रम निर्माण करण्याचा उद्योग काही लोकांमार्फत केला जातो. असे नमूद करीत अमीरचंद म्हणतात, भारतीय संस्कृतीच्या मूलतत्वांकडे आजवर जे दुर्लक्ष झाले त्यात सुधारणा घडवण्याचे व हा भ्रम दूर करण्याचे काम केंद्र सरकारचे आहे. केंद्रीय संस्कृती मंत्रालयाने त्यासाठी राष्ट्रीय स्तरावरचे चर्चासंवाद, इतिहासकालीन विषयांवर कार्यशाळा, व व्यापक संशोधनाला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, संस्कार भारतीतर्फे ही मागणीही केंद्र सरकारकडे केली जाईल.