मानवी कश्यप बनली देशाची पहिली ट्रान्सजेंडर सब-इन्स्पेक्टर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2024 10:41 AM2024-07-11T10:41:54+5:302024-07-11T10:44:35+5:30
तीन ट्रान्सजेंडर्सची पोलिस निरीक्षक म्हणून नियुक्ती करणारे बिहार हे देशातील पहिलेच राज्य बनले आहे.
एस.पी. सिन्हा
पाटणा : बिहारपोलिस सेवा आयोगाने बिहारपोलिसांमधील पोलिस उपनिरीक्षक स्पर्धा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर केला आहे. शारीरिक क्षमता, शैक्षणिक पात्रता, वय आणि आरक्षण आदी पात्रता या आधारे ३ हजार ७२७ उमेदवारांमधून १२७५ उमेदवारांची अंतिम निवड केली आहे. या निकालामध्ये तीन ट्रान्सजेंडर्सचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे तीन ट्रान्सजेंडर्सची पोलिस निरीक्षक म्हणून नियुक्ती करणारे बिहार हे देशातील पहिलेच राज्य बनले आहे. यापूर्वी केरळमध्ये ट्रान्सजेंडरला सरकारी सेवेत कॉन्स्टेबल म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे.
समाजाकडून छळ
निवड झालेल्या तीन ट्रान्सजेंडर्सपैकी भागलपूरची मानवी मधु कश्यप ही ट्रान्सवुमन आहे. कश्यप ही देशातील पहिली ट्रान्सजेंडर सब-इन्स्पेक्टर बनली आहे. सामाजिक स्तरावर अनेक प्रकारच्या छळाचा सामना करणारी मानवी २०१४ मध्ये घरातून पळून गेली होती.
घरातून पळून गेली, शिकविण्यास नकार दिला पण...
मानवीने सांगितले की, माझ्यामुळे घरातील सदस्यांना सर्व प्रकारच्या वाईट गोष्टी ऐकायला मिळायच्या आणि मन अस्वस्थ व्हायचे. शेवटी कोणताही पर्याय न उरल्याने मी घर सोडून पळून गेली. मानवीने राज्यशास्त्रासह मॅट्रिक इंटर आणि बीए ऑनर्सचे शिक्षण घेतले आहे.
समाजात ट्रान्सजेंडर्सबद्दलचा चुकीचा दृष्टिकोन पाहून मानवीला काहीतरी करण्याची प्रेरणा मिळाली आणि याच प्रेरणेने ती २०२२ मध्ये पाटण्यात आली. पाटण्यात आल्यानंतर तिचा संघर्ष सुरूच राहिला. मधु अनेक कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये गेली. पण, तिला शिकवण्यासही सर्वांनी नकार दिला.
याचदरम्यान तिची भेट गुरु रहमानशी झाली. रहमानने तिला प्रोत्साहन दिले आणि तिच्यासोबत इतर दोन ट्रान्सजेंडर्सनाही इन्स्पेक्टरची परीक्षा उत्तीर्ण होण्यास मदत केली.
ट्रान्सजेंडर ही देखील देवाची देणगीच...
मानवी तिच्या यशाचे श्रेय तिचे आई-वडील आणि गुरु रहमान यांना देते. ती म्हणते की, ट्रान्सजेंडरचे जीवन सोपे नसते, परंतु या सर्व लोकांनी तिला नेहमीच प्रोत्साहन दिले. मानवी सांगते की, ती नियमितपणे ५ ते ६ तास अभ्यास करायची. तिचे वडील आता या जगात नाहीत, पण त्यांच्या साहसाने तिला इथपर्यंत पोहोचण्यास खूप मदत केली.
समुदायासाठी खूप काम करणार असल्याचे तिने सांगितले. ट्रान्सजेंडर्सबद्दल लोकांच्या वर्तनात बदल घडवून आणण्याचा तिचा प्रयत्न आहे. ट्रान्सजेंडर ही देखील देवाची देणगी आहे आणि त्यांच्याकडे वेगळे पाहण्याची गरज नाही. त्याचे यश इतर अनेक ट्रान्सजेंडरसाठी प्रेरणा बनू शकते, जे समाजात त्यांच्या हक्कांसाठी आणि सन्मानासाठी झगडत आहेत, असे तिने सांगितले.