अनेक देशांचे भारतीय लस मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2021 05:52 AM2021-01-11T05:52:49+5:302021-01-11T05:53:36+5:30
भारत बनला जगाचे आशास्थान
नवी दिल्ली : भारतामध्ये बनविण्यात आलेल्या कोरोना लसी मिळविण्यासाठी शेजारी देशांसह इतर खंडातील अनेक देशांनी आता प्रयत्न सुरू केले आहेत. या देशांना कोरोना लसीचा पुरवठा करण्याचा भारताचा विचार आहे. कोरोना साथीवर कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन लस विकसित झाल्यानंतर आता हे देश भारताकडे आशेने पाहू लागले आहेत. कोरोना लसी घेण्यासाठी म्यानमार व दक्षिण आफ्रिका यांनी याआधीच भारताशी करार केला आहे. नेपाळ, श्रीलंका हे शेजारी देश तसेच कझाकस्तान हे कोरोना लस मिळविण्यासाठी भारताच्या संपर्कात आहेत.
कोरोनावरील उपचारांसाठी हायड्रोक्सिक्लोरोक्विनच्या गोळ्या परिणामकारक ठरतात असे काही शास्रज्ञांचे मत होते. त्या काळात भारताने अमेरिकेसह १५० देशांना हायड्रोक्सिक्लोरोक्विनच्या गोळ्यांचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा केला होता. मात्र या गोळ्यांचा कोरोना उपचारांत काही प्रभाव पडत नाही, असे दिसल्यानंतर त्या मागविण्याचे प्रमाण थंडावले. कोरोनाच्या उपचारांत उपयोगी ठरणाऱ्या जेनेरिक औषधांचा पुरवठा भारतातून सध्या अनेक देशांना होत आहे.
मध्य आशियातील देशांनाही हवी लस
मध्य आशियातील देशांना कोरोना लसीचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा करण्याची योजना भारताने आखली आहे. त्यामध्ये बांगलादेश, भूतान, मालदीव, व्हिएतनाम, कंबोडिया, किरगिझस्तान, उझबेकिस्तान या देशांचा समावेश आहे.
अमेरिकेतील आठ राज्यांत नवा विषाणू
अमेरिकेतील आठ राज्यांमध्ये कोरोनाच्या नव्या विषाणूचे रुग्ण आढळून आले असून, त्यांची संख्या वाढती आहे. कॅलिफोर्निया, फ्लोरिडामध्ये नव्या विषाणूच्या रुग्णांची संख्या अधिक आहे. अमेरिकेत दोन कोटी २६ लाख कोरोना रुग्ण आहेत.