नीरव मोदीच्या दिवाळखोर कंपनीसाठी अनेक उत्सुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2018 03:27 AM2018-03-02T03:27:25+5:302018-03-02T03:27:25+5:30
पंजाब नॅशनल बँकेतील (पीएनबी) हजारो कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी याची अमेरिकेतील दिवाळखोर कंपनी खरेदी करण्यास खरेदीदारांनी जबरदस्त उत्सुकता दर्शविली आहे, असे न्यूयॉर्क येथील न्यायालयात दाखल दस्तावेजात म्हटले आहे.
नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेतील (पीएनबी) हजारो कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी याची अमेरिकेतील दिवाळखोर कंपनी खरेदी करण्यास खरेदीदारांनी जबरदस्त उत्सुकता दर्शविली आहे, असे न्यूयॉर्क येथील न्यायालयात दाखल दस्तावेजात म्हटले आहे.
पीएनबी घोटाळा उघडकीस आल्यानंतर अडचणीत आलेल्या नीरव मोदीच्या फायरस्टार डायमंडस् आयएनसी या कंपनीने २६ फेब्रुवारी रोजी अमेरिकेत दिवाळखोरी संरक्षणासाठी अर्ज केला आहे. नीरव आणि त्याचा मामा मेहुल चोकसी याच्या मालकीच्या अनेक कंपन्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. कंपन्यांच्या असंख्य मालमत्ता जप्त करण्यात आल्या. फायरस्टारविरुद्ध पोलीस तक्रार करण्यात आलेली नाही. या पार्श्वभूमीवर फायरस्टारने दिवाळखोरी संरक्षणासाठी अर्ज दाखल केला आहे. कंपनीच्या वतीने बुधवारी न्यायालयात सादर करण्यात आलेल्या दस्तावेजात म्हटले आहे की, कंपनीचा काही अथवा सर्व व्यवसाय खरेदी करण्यास अनेक इच्छुक खरेदीदारांनी अमाप उत्सुकता दर्शविली. कंपनीने कर्जदात्यांसोबत वाटाघाटीही सुरू केल्या आहेत.
फायरस्टार डायमंडस् आणि तिच्या सहयोगी कंपन्यांची वार्षिक विक्री ९० दशलक्ष डॉलर आहे. कॉस्टको व्होलसेल, मॅकीज आणि जेसी पेन्नी को आयएनसी यासारख्या मान्यवर संस्था कंपनीच्या ग्राहक आहेत. फायरस्टारने दाखल केलेल्या दिवाळखोरी अर्जात म्हटले आहे की, भारतातून आपल्याला आभूषणांचा पुरवठा करणाºया मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत, तसेच व्यवसाय बंद केले गेले आहेत. त्यामुळे कंपनीची पुरवठा साखळीच तुटली आहे.
>अनेक वेळा बदलले नाव
सध्या फायरस्टार डायमंडस् या नावाने ओळखल्या जाणाºया नीरव मोदीच्या कंपनीचे नाव अनेक वेळा बदलण्यात आले आहे. डेलावेअर कॉर्पोरेशन म्हणून स्थापन झालेली ही कंपनी २००४ साली ज्वेलरी सोल्युशन्स इंटरनॅशनल या नावाने ओळखली जात होती. २००५ मध्ये तिचे नाव नेक्स्ट डायमंड आयएनसी असे करण्यात आले. २००७ मध्ये तिला फायरस्टोन आयएनसी हे नाव दिले गेले. २०११ मध्ये कंपनीचे नाव बदलून फायरस्टोन डायमंड असे करण्यात आले. तेच सध्या वापरात आहे.