भाजप यादीतून अनेक चेहरे गायब, PM मोदी यांचे नाव व काम यावरच लढणार निवडणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2022 06:37 AM2022-11-11T06:37:53+5:302022-11-11T06:38:28+5:30
भाजपने गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी गुरुवारी १६० उमेदवारांची यादी जाहीर करताना पक्षाच्या आगामी राजकारणाचे संकेत दिले आहेत.
शरद गुप्ता
नवी दिल्ली :
भाजपने गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी गुरुवारी १६० उमेदवारांची यादी जाहीर करताना पक्षाच्या आगामी राजकारणाचे संकेत दिले आहेत. निवडणुकीत विजयासाठी उमेदवाराचा चेहरा महत्त्वाचा मानलेला नाही. महापालिकेपासून लोकसभेपर्यंत प्रत्येक निवडणुकीत विजयासाठी भाजपला केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव पाहिजे.
मागील वर्षी भूपेंद्र पटेल यांना मुख्यमंत्री करण्यासह त्यांच्या मंत्रिमंडळात सर्व नवीन चेहरे आणण्याची ही सुरुवात होती. त्यानुसारच पक्षाने ३८ विद्यमान आमदार आहेत. त्यात माजी मुख्यमंत्री रूपाणी, माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल, विधानसभा अध्यक्ष डॉ. निमाबेन आचार्य, माजी गृह राज्यमंत्री प्रदीपसिंह जडेजा, माजी वित्तमंत्री सौरभ पटेल, यांच्याबरोबरच राजेंद्र त्रिवेदी, प्रदीप परमार यांच्यासह पाच विद्यमान मंत्र्यांची तिकिटे कापली आहेत.
भाजपकडून एक तृतीयांश तिकिटे प्रथमच निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांना दिली आहेत. यामुळे माजी आमदारांची नाराजीही संपविण्यासाठी पक्षाला मदत मिळणार आहे. तथापि, गुजरातमध्ये भाजपला या निवडणुकीत विजयासाठी नवीन चेहऱ्यांची गरज पडत असल्याचे दिसत आहे.
काँग्रेसमधून आलेल्यांना संधी
- हार्दिक पटेल यांच्यासह गुजरातमधील काँग्रेसच्या अनेक माजी आमदारांना, ज्यांनी गेल्या पाच वर्षांत आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला, त्यांना सत्ताधारी पक्षाने आगामी विधानसभा लढण्याची संधी दिली आहे.
- २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने ७७ जागा जिंकल्या होत्या. या आमदारांपैकी २० आमदारांनी गेल्या पाच वर्षात राजीनामा दिला, तर ३ जणांनी गेल्या २ दिवसांत राजीनामा दिला आहे.
मोरबीच्या आमदाराचे तिकीट कापले
गुजरातमधील आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) ज्या ३८ विद्यमान आमदारांना तिकीट दिलेले नाही, त्यात मोरबीचे आमदार आणि कामगार आणि रोजगार राज्यमंत्री ब्रिजेश मेरजा यांच्यासह पाच राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. मोरबी येथे गेल्या महिन्यात पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत १३५ जणांचा मृत्यू झाला होता.
पालिकेपासून लोकसभेपर्यंत...
- मध्य प्रदेश असो किंवा दिल्ली, महाराष्ट्र असो, प्रत्येक राज्यातील महापालिकांपासून लोकसभेपर्यंत भाजप आता केवळ मोदींच्या नावावर निवडणूक लढणार आहे.
- २०१७ मध्ये पुणे महापालिकेत प्रथम बहुमत मिळाल्यावर भाजपला महापौर होण्याची संधी मिळाली.
- यावेळी ४ डिसेंबर रोजी दिल्ली महापालिका निवडणुकीतही मोदींचे नाव व कामावर निवडणूक लढविण्यात येणार आहे.
- याचमुळे संभाव्य उमेदवारांकडून त्यांच्या आवडीच्या वॉर्डबरोबरच ते निवडणूक लढू शकणाऱ्या आणखी किमान चार वॉर्डांची नावे मागितली जात आहेत.