नेहरूंच्या त्यागाचा अनेकांना विसर - वरूण गांधींचा मोदींवर निशाणा
By admin | Published: September 3, 2016 11:54 AM2016-09-03T11:54:59+5:302016-09-03T11:57:41+5:30
पंडित नेहरू १५ वर्ष तुरूंगात होते, त्यांनी केलेल्या त्यागाचा अनेकांना विसर पडतो असा शब्दांत वरूण गांधींनी मोदींवर निशाणा साधला.
Next
>ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. ३ - पंडित नेहरू श्रीमंत घराण्यातील होते आणि त्यांना सहजपण भारताचे पंतप्रधानपद मिळाले, असं अनेकांना वाटतं. पण नेहरू १५ वर्ष तुरूंगात राहिले होते, त्यांनी केलेल्या त्यागाचा अनेकांना विसर पडतो, अशी जाणीव करून देताना भाजपा नेते वरूण गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर अप्रतक्षपण निशाणा साधला. ते शुक्रवारी लखनऊ येथील युवा संमेलनात बोलत होते. यावेळी त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. तसेच केंद्र सरकारची धोरणे व पंतप्रधान मोदींवर अप्रत्यक्षपण टीका केली.
उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वरूण गांधींच्या विधानांमधून त्यांची नाराजी दिसत असून तो चर्चेचा विषय ठरला आहे. ' पंडित नेहरू अगदी सहजपणे भारताच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले, त्यांची जीवनशैली ऐषोआरामी आणि राजासारखी होती, असे अनेकजण म्हणतात. मात्र, त्याच पंडित नेहरूंनी तब्बल पंधरा वर्षे तुरूंगात काढली, याचाच अनेकांना विसर पडतो' अशा शब्दांत वरूण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. ' मला आज जर कुणी म्हणालं, १५ वर्षं तुरूंगात राहा आणि त्यानंतर तुला पंतप्रधानपद देतो, तर मी तो प्रस्ताव कधीच स्वीकारणार नाही. १५ वर्षांच्या काळात माणसाच्या जीवनात खूप मोठा फरक पडतो, त्याचा जीवही जाऊ शकतो,' असेही वरूण यांनी आपल्या भाषणात म्हटले. तसेच ' आयुष्यात वेगाने पुढे जायचे असेल तर एकटे जा, पण दूरवर जायचे असेल तर सर्वांना सोबत घेऊन जा,' हे नेल्सन मंडेला यांचे वचनही उधृत करत त्यांनी मोदींच्या कार्यशैलीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचे बोलले जात आहे.