सोनिया गांधी, राहुल गांधी, राजनाथ सिंह यांच्यासह अनेक दिग्गजांचा पाचव्या टप्प्यात होणार फैसला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2019 06:24 AM2019-05-06T06:24:57+5:302019-05-06T06:25:17+5:30
लोकसभा निवडणुकीचे चार टप्पे पार पडल्यानंतर सोमवारी पाचव्या टप्प्याचे मतदान होणार आहे. या टप्प्यात एकूण ५१ जागांवर लढाई होणार आहे.
लोकसभा निवडणुकीचे चार टप्पे पार पडल्यानंतर सोमवारी पाचव्या टप्प्याचे मतदान होणार आहे. या टप्प्यात एकूण ५१ जागांवर लढाई होणार आहे. त्यात अनेक ठिकाणी बड्या नेत्यांचे भवितव्य यंत्रबंद होणार आहे. भाजपसाठी उत्तर प्रदेशातील या टप्प्यातील १४ पैकी १२ जागा राखण्याचे आव्हान असणार आहे.
रायबरेली । सोनिया गांधी पुन्हा गड राखणार?
संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्ष सोनिया गांधी या रायबरेली मतदारसंघामधून निवडणूक लढवीत आहेत. सन २००४ पासून त्या या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. हा मतदारसंघ कॉँग्रेसचा गड असून केवळ दोन -तीन अपवाद वगळता येथून अन्य पक्षाचा उमेदवार विजयी झाला आहे. या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व फिरोज गांधी, इंदिरा गांधी तसेच शीला कौल या नेहरू-गांधी कुटुंबातील सदस्यांनी केलेले आहे.
यावेळी सोनिया गांधी यांच्या विरोधामध्ये भाजपचे दिनेश प्रताप स्ािंह हे उभे आहेत. प्रगतिशील समाजवादी पार्टीनेही येथून उमेदवार दिला आहे. सोनिया गांधी यांच्या प्रचारासाठी त्यांची कन्या प्रियांका गांधी यांनी हा मतदारसंघ पिंजून काढला आहे. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी भाजपने येथे सनी देओल यांची रॅली काढली होती.
अमेठी । राहुल गांधी विरोधात स्मृती इराणी
कॉँग्रेसचा बळकट किल्ला असलेल्या अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व कॉँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे सन २००४ पासून करीत आहेत. यापूर्वी या मतदारसंघामधून संजय गांधी, राजीव गांधी तसेच सोनिया गांधी यांनी निवडणूक जिंकलेली आहे. मागील निवडणुकीमध्ये भाजपच्या स्मृती इराणी यांनी चांगली लढत देऊन राहुल गांधी यांचे मताधिक्य कमी केले होते. यावेळीही त्यांनाच पक्षाने पुन्हा मैदानामध्ये उतरविले आहे. राहुल गांधी यांच्यामुळे ही जागा भाजपने प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळेच इराणी यांच्या प्रचारासाठी भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांच्यासह अनेक बडे नेते येऊन गेले. राहुल गांधी यांच्यासाठी त्यांची बहीण प्रियांका गांधी प्रचार करीत होत्या. त्यामुळेच या जागेकडे सर्वांचे लक्ष आहे.
लखनौ । राजनाथ सिंह यांच्याविरोधात शत्रुघ्न सिन्हा यांच्या पत्नी
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा मतदारसंघ अशी ओळख असलेल्या या जागेचे सध्या केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह हे या प्रतिनिधित्व करीत आहेत. यंदाही तेच भाजपचे उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधामध्ये सपा-बसपा युतीने शत्रुघ्न सिन्हा यांच्या पत्नी पूनम सिन्हा यांना तर कॉँग्रेसने प्रमोद कृष्णम् यांना उमेदवारी दिली आहे. कॉँग्रेसने आपला उमेदवार मागे घेण्यास नकार दिल्याने येथे तिरंगी लढत होत आहे.
रांची । सुबोधकांत सहाय घेणार पराभवाचा बदला?
झारखंडची राजधानी असलेल्या या शहरात होत असलेली तिहेरी लढत लक्षणीय आहे. भाजपने विद्यमान खासदार असलेल्या राम तहल चौधरी यांना तिकीट नाकारल्याने ते अपक्ष म्हणून मैदानामध्ये उतरले आहेत. त्यांच्या विरोधात भाजपचे माजी खासदार संजय पांडे तर कॉँग्रेसतर्फे माजी केंद्रीय मंत्री सुबोधकांत सहाय आहेत. मागील निवडणुकीतील पराभवाचा बदला घ्यायला सुबोधकांत सहाय हे उत्सुक आहेत.
हजारीबाग । जयंत सिन्हा यांच्यासमोर आव्हान
केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा हे हजारीबागमधून पुन्हा मतदारांचा कौल घेण्यासाठी भाजपतर्फे उभे आहेत. त्यांच्या विरोधात कॉँग्रेसने माजी खासदार शिवप्रसाद साहू यांचे बंधू गोपाल साहू यांना मैदानात उतरविले आहे. तसेच भाकपने माजी खासदार तसेच झारखंडचे स्टॅलिन अशी ओळख असलेल्या भुवनेश्वर प्रसाद मेहता यांना उमेदवारी दिली आहे.
सारन । राजीव प्रताप रुडी यांचे राजदशी दोन हात
बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांचा हा मतदारसंघ. मागील लोकसभा निवडणुकीमध्ये राबडी देवी यांचा पराभव करून निवडून आलेले भाजपचे राजीव प्रताप रुडी यांना केंद्रीय मंत्रीपदाची लॉटरीही लागली. यावेळी ते पुन्हा एकदा येथून निवडणूक लढवीत आहेत. त्यांच्या विरोधात राष्टÑीय जनता दलाने चंद्रिका राय यांना उमेदवारी दिली आहेत. चंद्रिका राय हे लालूप्रसादांचे पुत्र तेजप्रताप यांचे सासरे आहेत. मात्र, राय यांच्या उमेदवारीला तेजप्रताप यांनी जाहीरपणे विरोध केल्याने या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
बिकानेर । केंद्रीय मंत्र्याचा चुलत भावाशीच सामना
राजस्थानच्या या मतदारसंघामधून केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल हे पुन्हा भाजपतर्फे नशीब अजमावत आहेत. यावेळी त्यांची गाठ त्यांचे चुलत बंधू कॉँग्रेसचे उमेदवार मदन गोपाल मेघवाल यांच्याबरोबर आहे. हे दोघेही माजी अधिकारी आहेत. अर्जुन मेघवाल हे सनदी अधिकारी होते तर मदन मेघवाल हे पोलीस अधिकारी होते. गेली १५ वर्षे हा मतदारसंघ भाजपकडे आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमुळे समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जयपूर (ग्रामीण) । आॅलिम्पिकपटूंची राजकीय मैदानावर होणार लढत
दोन माजी आॅलिम्पिक खेळाडूंमध्ये येथे होणारी लढत ही आकर्षणाचे केंद्र आहे. भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड आणि कॉँग्रेसतर्फे थाळीफेकपटू कृष्णा पुनिया यांच्यात सामना होत आहे. मागील निवडणुकीमध्ये केंद्रीय मंत्री सी. पी. जोशी यांना पराभूत करून विजयी झालेले राठोड हे पूर्वीपासूनच प्रचाराला लागले होते. त्यामानाने पुनिया यांचा प्रचार उशिराने सुरू झाला. किसान की बेटी म्हणून सर्वांशी संवाद साधणाऱ्या पुनिया यांनी राठोड यांच्या मतदारसंघातील दुर्लक्षाला प्रचाराचा मुद्दा बनविला आहे. राठोड हे मोदी करिष्श्याचा वापर करीत आहेत.