अनेक प्रकल्प साकारले
By admin | Published: October 10, 2014 02:58 AM2014-10-10T02:58:25+5:302014-10-10T02:58:25+5:30
चांगल्या कामांना विरोध करण्याचे काम विरोधक करीत आहेत. प्रजा फाउंडेशन या संस्थेने आमदारांच्या कामांवर तयार केलेल्या रिपोर्ट कार्डमध्ये सलग चारवेळा मला ‘मिस्टर कमिटेड’ म्हणून गौरविले आहे
मतदारसंघात तुमच्याविरोधात नाराजी असल्याची टीका विरोधकांमधून होत आहे. त्याबद्दल काय सांगाल?
- चांगल्या कामांना विरोध करण्याचे काम विरोधक करीत आहेत. प्रजा फाउंडेशन या संस्थेने आमदारांच्या कामांवर तयार केलेल्या रिपोर्ट कार्डमध्ये सलग चारवेळा मला ‘मिस्टर कमिटेड’ म्हणून गौरविले आहे. विधानसभेत मुंबईतील समस्यांवर सर्वाधिक प्रश्न विचारण्याचा विक्रम माझ्या नावावर आहे. नरे पार्कमध्ये स्विमिंग पूल, क्रीडा संकुल, शिवडीचा किल्ला, डायलेसिस सेंटर, इंग्रजी माध्यमाची शाळा अशा विविध प्रकल्पांतून मी १०० टक्के निधीचा वापर केला आहे. फिरत्या वाहनांच्या माध्यमातून स्वस्त भाजीपाला व अन्नधान्य उपलब्ध करून देत आहे. रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून सुमारे २ हजार तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला. विरोधकांच्या बाकावर बसून शासनाकडून १० कोटी रुपयांचा निधी शिवडीकरांसाठी मिळवला.
पुढील पाच वर्षांत तुमचे व्हिजन काय?
- शिवडीच्या किल्ल्याच्या माध्यमातून या ठिकाणच्या लोकांना एक जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ उपलब्ध करून देणार आहे. त्या माध्यमातून स्थानिकांना रोजगारही उपलब्ध होईल. राज्यातील विनयभंग आणि अत्याचाराच्या घटना पाहता ९ वर्षांवरील तरुणींना प्रशिक्षित कमांडोकडून स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देणार आहे. जेणेकरून कोणत्याही मुलीला तिचे पालक निर्धास्तपणे घराबाहेर पडू देतील. याशिवाय लोकांकडून विविध संकल्पना मी मागवत असतो. लोकांना जे हवे आहे, ते मी देण्याचा प्रयत्न करतो.
मतदार तुम्हाला पुन्हा एक संधी देतील का?
- माझगावमधील नागरिकांनी मला चारवेळा निवडून दिले ते माझ्या कामामुळे. आपण निवडून दिलेला आमदार राज्यभर एका पक्षाचे नेतृत्व करतोय, याचा अभिमान शिवडीकरांनाही आहे. माझगावकरांइतकाच वेळ शिवडीकरांना देता आला नाही, याची खंत आहे. मात्र शिवडीकरांसाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग, संगीतकार स्व. ठाकरे उद्यान, कै. विवेक खाड्ये स्मृती भवन, भावसार समाज हॉल, लालबागचे बहुउद्देशीय सांस्कृतिक सभागृह असे अनेक प्रकल्प प्रगतिपथावर आहेत. असे अनेक प्रकल्प उभारण्यासाठी पुन्हा एकदा ते मलाच संधी देतील, यात शंका नाही.