'मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या कोरोना पॉझिटीव्ह अहवालावर अनेक प्रश्न'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2020 05:50 PM2020-07-25T17:50:12+5:302020-07-25T17:52:21+5:30
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की, माझ्यात कोविड १९ ची लक्षणं आढळली होती, त्यानंतर मी कोरोनाची टेस्ट केली, माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे
भोपाळ - मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. याबाबत स्वत: मुख्यमंत्र्यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. त्यासोबत मागील काही दिवसांपासून संपर्कात येणाऱ्या लोकांना क्वारंटाईन होण्याचं तसेच कोरोना चाचणी करण्याचं आवाहन मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केले आहे. मात्र, आता शिवराज सिंह चौहान यांच्या कोरोना अहवालावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की, माझ्यात कोविड १९ ची लक्षणं आढळली होती, त्यानंतर मी कोरोनाची टेस्ट केली, माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या लोकांना माझं आवाहन आहे, त्यांनी कोरोना चाचणी करावी आणि इतरांनी क्वारंटाईन व्हावं. चौहान यांच्या आवाहनानंतर, काही काँग्रेस नेत्यांनी त्यांच्या कोरोना रिपोर्टवरचं प्रश्न उपस्थित केले आहेत. प्रशासनाच्या नियोजनात नेमकी कुठे चूक झाली, ज्यामुळे राज्याचे प्रमुखच कोरोना संक्रमित झाले. मुख्यमंत्री निवास किंवा मंत्रालयात कोरोना गाईडलाईनचं पालन होत नाही का, असा सवालही अनेकांनी उपस्थित केला आहे.
काँग्रेस नेते दिग्विजयसिंह यांनी शिवराजसिंह चौहान यांच्या ट्विटला उत्तर देताना, आपली कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आल्याचे समजल्यानंतर दु:ख झाले असून परमेश्वर आपणास लवकर बरे करो, अशी प्रार्थना केली. तसेच, आपण सोशल डिस्टन्सचे पालन करायला हवे होते, जे केले नाही. माझ्यावर भोपाळ पोलिसांनी FIR दाखल केला होता, पण आपणावर कसे करणार? यापुढे काळजी घ्या, असेही दिग्विजय सिंह यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
दुख है शिवराज जी आप कोरोना संक्रमक पाया गए। ईश्वर आपको शीघ्र स्वस्थ करें। आपको सोशल डिस्टंसिंग का ख़्याल रखना था जो आपने नहीं रखा। मुझ पर तो भोपाल पुलिस ने FIR दर्ज कर ली थी आप पर कैसे करते। आगे अपना ख़्याल रखें। https://t.co/Ob4lhKuobp
— digvijaya singh (@digvijaya_28) July 25, 2020
मध्य प्रदेशातील भोपाळ हे कोरोनाचं हॉटस्पॉट असतानाही राजकीय नेत्यांकडून सोशल डिस्टन्स आणि नियमांचे पालन होत नाही का, असा प्रश्न विचारण्यात येत आहे. शिवराजसिंह यांच्या अगोदर त्यांचे मंत्रालयीन सहकारी अरविंद भदौरिया यांनाही कोरोनाची बाधा झाली होती. 22 जुलै रोजी भदौरिया यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला होता, त्यादिवशी मुख्यमंत्री चौहान यांसमवेत त्यांनी बैठकीला हजेरी लावली होती.
दरम्यान, मध्य प्रदेशात आतापर्यंत कोरोनाचे २६ हजार २१० रुग्ण आढळले आहेत. यात ७ हजार ५५३ सक्रीय रुग्ण आहे. तर इतर १७ हजार ८६६ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. आतापर्यंत राज्यात ७९१ लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या ४८ तासांत भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत जवळपास १ लाखांची वाढ झाली आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना करण्यात येत असल्या तरी दिवसाला कोरोना रुग्ण वाढत आहेत.