अनेक राज्ये गारठली, थंडी आणखी वाढणार; जम्मू-काश्मिरात उणे तापमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2024 07:37 IST2024-12-15T07:35:49+5:302024-12-15T07:37:45+5:30
तापमानात मोठी घट झाल्याने दिल्ली, राजस्थानसह देशातील अनेक राज्ये गारठली असून, नागरिकांना हुडहुडी भरली आहे.

अनेक राज्ये गारठली, थंडी आणखी वाढणार; जम्मू-काश्मिरात उणे तापमान
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील बहुतांश भागात शनिवारी तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाली. त्यामुळे पुढील तीन दिवस काश्मीर खोऱ्यात अनेक ठिकाणी थंडीची लाट पसरण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तापमानात मोठी घट झाल्याने दिल्ली, राजस्थानसह देशातील अनेक राज्ये गारठली असून, नागरिकांना हुडहुडी भरली आहे.
काश्मीर खोऱ्यात थंडीची लाट पसरल्याने श्रीनगरमध्ये किमान तापमान उणे ४.६ सेल्सिअस नोंदवले. आदल्या रात्रीच्या तुलनेत हे तापमान दोन अंश सेल्सिअसने कमी होते. गुलमर्गमध्ये उणे ७.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
राजस्थानातील बहुतांश भागात कडाक्याची थंडी
२१ डिसेंबरपर्यंत काश्मीर खोऱ्यातील हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. देशाची राजधानी दिल्लीत शनिवारी किमान तापमान आठ अंश सेल्सिअस नोंदले गेले, ते सरासरी तापमानापेक्षा एक अंशाने कमी होते. सकाळी ९ वाजता दिल्लीतील हवा गुणवत्ता निर्देशांक अर्थात एक्यूआय खराब श्रेणीत २०४ नोंदवण्यात आली. राजस्थानातील बहुतांश भागात कडाक्याची थंडी पडली असून, फतेहपूरमध्ये किमान तापमान शून्यापेक्षा कमी नोंदविण्यात आले.
केंद्राचे प्रदूषण कमी करण्यासाठी उपाय
दिल्ली व राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील वाढत्या प्रदूषणावर आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने सुधारित उपाययोजना जारी केल्या आहेत. हवेची गुणवत्ता खराब झाल्यास कठोर उपाययोजना लागू करणे, तसेच प्रदूषण जास्त वाढल्यास शाळांना हायब्रीड लर्निंग किंवा ऑनलाइन पद्धतीचा मार्ग निवडण्याचा पर्याय देण्यात आला. खराब हवामानामुळे सहसा नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत प्रदूषण वाढत असल्याने या उपाययोजना केल्या.